शिंदे-फडणवीस यांच्याबाबतीत भिडे गुरुजींचे मोठं विधान, म्हणाले…

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असून या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थापकचे प्रमुख भिडे गुरुजी यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले. तसेच, मराठा समाजाला आरक्षण मिळणार का, हा प्रश्न म्हणजे उद्या सूर्य उगवणार का, असा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणार असे संभाजी भिडे यांनी म्हटले.

संभाजी भिडे यांनी यापूर्वी अंतरवाली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर, आता सांगलीत सुरू असलेल्या साखळी उपोषणाला भेट दिली. त्यावेळी, मराठा समाजाला आरक्षण मिळणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हिंदुस्थानचा प्राण महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्रात म्हणजे मराठा समाजात आहे, असेही त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलंय.

मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस हे राजकारणापलिकडचा विचार करणारे आहेत. दे देशासाठी जगणारे आहेत. ही माणसं बनवणारी नाहीत, लबाडीनं वागणारी नाहीत, स्वत:चा हच्चा राखून काम करणारी नाहीत, असे म्हणत ते नक्कीच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतील, असे संभाजी भिडेंनी म्हटले.

ही समस्या शंभर टक्के सुटणार आहे. हे लांबलं याचं कारण मी स्वत:लाच म्हणून घेतो. माझ्यासारखे राजकारणी लबाड लोकं आहेत. हे चिघळताच कामा नये. जरांगे पाटलांनी लक्षात घेतलं पाहिजे की, उद्या सूर्योदय होणार आहे. शंभर टक्के होणार आहे. लहान लेकरु चालायला शिकताना आईच्या पावलावर पाऊल टाकतं. तसंच थोडं आपण लक्षात घेतलं पाहिजे. होणार आहे. शंभर टक्के होणार आहे, असे म्हणत राजकीय लोकांमुळेच हा प्रश्न लांबला असल्याचंही संभाजी भिडे यांनी म्हटलं. दरम्यान, या आंदोलनाचं नेतृत्त्व जरांगे पाटील यांच्याकडेच असायला हवं, असेही त्यांनी स्पष्ट केले.