2 घुसखोर ठार : जम्मू-काश्मीमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश

तरुण भारत लाईव्ह । पुंछ : जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पूंछ सेक्टरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले असून, त्यांनी घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला आहे. जवानांनी 2 घुसखोरांना ठार केले आहे. लष्कराने ऑपरेशन बहादूर सुरू केले होते, त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. परिसरात लष्कर आणि पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे. विशेष म्हणजे, खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सतत मोहीम राबवली जात असूनही, दहशतवादी त्यांच्या कारवाया मागे घेत नाहीत. सीमेपलीकडून सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न होत आहेत, मात्र सुरक्षा दल प्रत्येक नापाक प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) आणखी एक मोठी बातमी म्हणजे, पोलिसांनी लष्करासोबत केलेल्या संयुक्त कारवाईत हंदवाडा येथील वोधपुरा जंगल परिसरातून 2 IED जप्त केले आहेत. हंदवाडा पोलिसांसह लष्कराने पहाटे वोधपुरा जंगलात शोध मोहीम सुरू केली. ज्यामध्ये NH 701 जवळील वोधपुरा रिज येथून सुमारे 5 आणि 7 किलो वजनाचे दोन IED जप्त करण्यात आले. सुरक्षा दलांनी तातडीने परिसराला वेढा घातला आणि आवश्यक कारवाई केली. इतर आयईडी किंवा दहशतवादी लपून बसण्याची शक्यता असल्याने शोध मोहीम राबवली जात आहे. सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने तातडीने केलेल्या कारवाईमुळे परिसरात मोठी घटना टळली.