---Advertisement---
Eknath Khadse : राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांनी तपासचक्रे फिरवित अखेर ताब्यात घेतले आहे. तर तीन जण फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.
चोरी करण्यापूर्वी आणि केल्यानंतर चोरटे मास्टर कॉलनीत राहणाऱ्या नातेवाइकांकडे थांबले होते. त्यामुळे चोरट्यांचा आश्रय देणारा नातेवाईक जियाउद्दीन शेख हुसनोद्दीन शेख (वय ३९, रा. मास्टर कॉलनी) यालाही या गुन्ह्यात आरोपी करून अटक केली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली आहे.
शिवराम नगरातील खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यात मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरी झाली होती. त्यांच्या बंगल्यातून ३७ हजारांच्या रोकडसह सोने चांदीचे दागिने असा एकूण ६ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला होता. चोरी केल्यानंतर चोरटे तीन बॅग घेवून दुचाकीवरुन ट्रिपलसीट जातांना शेजारील बंगल्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. घटनेचे गांर्भीय लक्षात घेत रामानंद नगर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक चोरट्यांच्या शोधार्थ मुंबईच्या दिशेने खाना झाले आणि त्यांच्याकडून चोरट्यांचा कसून शोध घेतला जात होता.
खडसेंच्या घरी चोरी करणारे चोरटे हे काही दिवसांपूर्वी मास्टर कॉलनीत राहणारे त्यांचे नातेवाईक जियाउद्दीन शेख हुसनोद्दीन शेख यांच्याकडे आले होते. काही दिवस जियाउद्दीन यांच्या घरी मुक्कामी राहिल्यानंतर त्यांनी मध्यरात्री खडसेंच्या बंगल्यात चोरी केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
चोरी करण्यासाठी चोरट्यांनी जियाउद्दीन शेख यांची (एमएच १९, ईआर ५५३९) क्रमांकाची दुचाकी वापरली होती. चोरी केल्यानंतर चोरटे पुन्हा जियाउद्दीन शेख यांच्या घरी गेले. त्यांनी दुचाकी त्यांच्याकडे लावून ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. अखेर पोलिसांनी यांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. तर तीन जण फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.
मुद्देमाल जप्त
या घटनेत खडसे यांनी कागदपत्र आणि सीडी चोरीस गेल्याचा आरोप केला होता. याबाबत खडसे यांनी पोलिसात केवळ दागिने चोरीस गेल्याची फिर्याद दिली होती. त्यानुसार मुद्देमाल जप्त केला आहे. सीडी अथवा कागदपत्र चोरीबाबत अद्याप पोलिस तपासात समोर आलेले नाही, त्याबाबत तपास सुरू असल्याचं पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी म्हंटले.









