---Advertisement---
Mamurabad Call Center Case : जळगाव : येथील बोगस कॉल सेंटर प्रकरणातील संशयित आरोपी व माजी महापौर ललित कोल्हे यांच्या स्वतःच्या मोबाइलवरून १८ आंतरराष्ट्रीय कॉल केले गेल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच या कॉल सेंटरवरून ६७आंतरराष्ट्रीय कॉल झाल्याचे तपासात समोर आले आहे. याविषयी तपासाधिकाऱ्यांनी न्यायालयात माहिती दिली.
अमेरिका, कॅनडा व इंग्लंडसह अन्य देशांमधील नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या जळगावातील बनावट कॉल सेंटरवर जळगाव पोलिसांनी २८ सप्टेंबर रोजी छापा टाकला होता, याप्रकरणी जागा मालक व माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह सात जणांना अटक करून त्यांना न्यायालयाने ४ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.
पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना ४ रोजी न्यायालयात हजर केले. तपासाधिकारी डीवाय. एसपी नितीन गणापुरे यांनी न्यायालयास माहिती दिली. त्यात त्यांनी फसवणुकीची पद्धत, तपासातील प्रगती व ललित कोल्हे (रा. कोल्हे नगर) यांच्यासह राकेश चंदू अगारिया (रा. वाघ नगर) या दोघांच्या पोलिस कोठडीची कारणे सांगून १० दिवसांची वाढीव पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानुसार ललित कोल्हे यांच्यासह दोन जणांना ८ ऑक्टोबरपर्यंत वाढीव पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तर उर्वरित पाच जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
पेंटर व महिलेच्या बँक खात्याशी मोबाइल लिंक
ललित कोल्हे यांचे बँक खाते यापूर्वीच अन्य यंत्रणांनी फ्रीज केले असल्याचे तपासाधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर सांगितले. मात्र बोगस कॉल सेंटरसाठी इंटरनेट कनेक्शन लावणारा, पेंटर काम, फर्निचर वाला यासह या गुन्ह्यातील संशयित राकेश अगारिया व आरती रमेश कोळी नामक महिलेच्या बँक खात्याशी ललित कोल्हे यांचे दोघं मोबाइल क्रमांक लिंक असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाल्याचे सांगण्यात आले.









