कोल्हापुरातील 9 कोटी चोरी प्रकरणातून एपीआय चंदनशिवे यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. या हत्येचा तपास लावण्यासाठी वारणानगर येथील 9 कोटी रुपयांच्या चोरी प्रकरणातील माहिती स्थानिक पोलिसांकडून मागवण्यात आली आहे. तसेच यामध्ये सामील असणाऱ्यांचीही चौकशी करण्यासाठी त्यांना संपर्क साधण्यात आला आहे. आता तपासात काय धक्कादायक खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चंदनशिवे हत्याप्रकरणी आरोपीच्या शोधासाठी सहा पथके रवाना झाली आहेत. या हत्या प्रकरणात आतापर्यंत सात लोकांची कसून चौकशी करण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी अद्यापही या खून प्रकरणी कोणताही सुगावा लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांसमोर तपासाबाबत आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, दोन दिवसात या खुनाचा तपास लागेल, असे तपास अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी सांगितले.
सांगली येथील निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे यांची बुधवारी रात्री अज्ञात व्यक्तींकडून हत्या करण्यात आली. यानंतर पहाटेच्या सुमारास त्यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आला होता. चंदनशिवे हे आपल्या मूळ गावी असलेल्या सांगोला तालुक्यातील वासुद गावात मुक्कामी आले होते. बुधवारी रात्री जेवण करुन चंदनशिवे नेहमीप्रमाणे वॉकसाठी गेले. मात्र नेहमीच्या वेळेत घरी न परतल्याने घरच्यांनी त्यांना फोन केला. मात्र त्यांचा पोन लागतच नव्हता. यानंतर थेट त्यांचा मृतदेहच आढळला.