नवी दिल्ली : जून २०२४ मध्ये १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण होणार असल्याने निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तयारी सुरू आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आोयागाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होवून आचारसंहिता लागू केली जाईल, अशी शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तवली जात होती. अशातच याबाबत आता नवी तारीख समोर आली आहे.
१४ मार्च रोजी निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणूक तारखांची घोषणा करू शकतो, अशी माहिती समोर आली आहे. मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडली जाईल, असे समजते. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मे महिन्यात निवडणूक निकाल घोषित केला जाईल.
दरम्यान, भाजपने देशभरातील आपल्या १९५ उमेदवारांची नावे जाहीर करुन मोठी आघाडी घेतली आहे. दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष सोबत आल्याने जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता घोषित होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी असल्याने एनडीए आणि इंडिया आघाडीकडून जागावाटपासाठी वेगवान प्रयत्न केले जात आहे.