नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या JN.1 व्हेरियंटने पुन्हा एकदा डोकंदुखी वाढवली आहे. सध्या देशात चार हजारहून अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण असून यातील बहुतेक रुग्ण नवीन कोरोना व्हेरियंटचे आहेत. यामुळे केंद्र सरकार अलर्टवर असून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं जात आहे. केंद्र सरकारने राज्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
देशात कोरोनाचा नवीन व्हेरियंट काही राज्यांमध्ये परसला आहे. सध्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशासह जगभरात जोरदार तयारी सुरु असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने चिंतेचं वातावरण आहे. कोरोनाचा नवीन JN.1 सब-व्हेरियंट हा कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा उपप्रकार आहे. JN.1 सब-व्हेरियंटचा वाढता धोका पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना कोरोना प्रकरणांमध्ये संभाव्य उद्रेकासाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी याबाबत म्हटलं आहे की, ‘आपल्याला अशा लसीची गरज आहे, जी कोरोना व्हायरसच्या कोणत्याही प्रकारावर प्रभावी ठरेल आणि संरक्षण देऊ शकेल. JN.1 हे Omicron चे एक उप-प्रकार आहे ज्यामध्ये उत्परिवर्तन झाले आहे, त्यामुळे Omicron विरुद्ध तयार केलेली लस या प्रकारावर देखील प्रभावी होईल. नागरिकांची सध्याची प्रतिकारशक्ती किती आहे या माहितीच्या आधारे नवीन लस किंवा बूस्टर डोसची गरज आहे की नाही, हे ठरवता येईल.”