पटणा : सन २०२४ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर सर्व प्रमुख पक्ष व आघाड्या कामाला लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसत आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री नितीश कुमार हे मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शक्यता आहे. तसेच ते बिहारमध्ये राष्ट्रपती शासन लावण्याची मागणी करू शकतात.
बिहारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्रीपदी असून विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीमध्ये नितीश कुमार यांचं नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर घेतलं जात आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजपाकडून नितीश कुमार यांना सातत्याने लक्ष्य केलं जात असल्याचं दिसून येत आहे. नितीश कुमार यांच्यावर बिहारमधील भाजपा नेत्यांप्रमाणेच काही केंद्रीय नेत्यांनीही टीका-टिप्पणी केल्यानंतर आता केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी नितीश कुमार व बिहारच्या राजकारणाबाबच मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
दिल्लीमध्ये जेडीयूची महत्त्वाची बैठक होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह हे आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. दुसरीकडे दिल्लीला रवाना होण्यापूर्वी नितीश किमार यांनी सांगितले की, दरवर्षी पक्षाची बैठक होते. ही नियमित बैठक आहे. त्याचवेळी नितीश कुमार यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याबाबत विचारले असता त्यांनी तो प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला. तसेच जेडीयूच्या राष्ट्रीय अध्यक्षांना बदलण्याच्या प्रश्नावरही त्यांनी मौन पाळले.
जेडीयूमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांच्यावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडीसोबत ललन सिंह यांची जवळीक वाढल्याने त्यांना अध्यक्षपदावरून हटवले जाण्याची शक्यता आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दुसरीकडे राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी जेडीयूचे नेते दिल्लीला रवाना होण्यास सुरुवात झाली आहे. बिहार सरकारमधील मंत्री अशोक चौधरी, मंत्री सुनील कुमार आणि मंत्री विजेंद्र यादव पाटणा विमानतळावरून रवाना झाले आहेत.