नवी दिल्लीः दिल्ली महानगर पालिकामध्ये पुन्हा एकदा भाजप-आपचे नगरसेवक एकमेकांना भिडले आहे. स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये आज भाजप आणि आम आदमी पार्टीचे सदस्य एकमेकांना भिडले. दरम्यान, गुरुवारी देखील मोठा राडा झाला होता, स्थायी समितीच्या निवडीसाठी संध्याकाळी ७ वाजल्यापासून सुरु झालेला हंगामा सकाळी सात वाजले तरी सुरूच होता.
दोन्ही गटांचे नगरसेवक एक-दुसऱ्याला बुक्क्यांनी मारहाण करत होते, एकमेकांचे केस ओढत होते. आज स्टँडिंग कमिटी निवडणुकीसाठी मतदान झालं. या निवडणुकीदरम्यान थेट मारहाण झाली. यावेळी दुसऱ्यांदा काऊंटिंगची मागणी करण्यात आली होती. याच मुद्द्यावरुन भाजप आणि आपचे नगरसेवक समोरासमोर आले.
दरम्यान, गुरुवारी देखील दिल्लीत सहा स्थायी सदस्यांची निवडणूक होती. स्थायी समिती निवडणूक रोखण्यासाठी भाजप नगरसेवकांनी मतपेटी चोरल्याचा आरोप आपच्या नेत्या आतीशी यांनी केला. तसेच भाजपाचे नगरसेवक कामामध्ये व्यतय आणण्यासाठी गोंधळ घालत होते. यामुळे काही मिनीटांनी कामकाज थांबविण्यात येत होते.
भाजपाकडून रघुपति राघव राजाराम हे नारे लावले जात होते, यामुळे स्थायी समितीच्या सदस्यांसाठी मतदान घेता आले नाही. यावेळेस दोन्ही गटाकडून एकमेकांवर पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आल्या. मध्यरात्रीमध्ये सभागृहाचे कामकाज काही वेळेसाठी पुन्हा थांबवण्यात आले. यादरम्यान, दोन्ही पक्षाच्या सदस्यांमध्ये धक्काबुक्की व हाणामारी झाली. यावेळी महिला नगरसेवकाही एकमेकींना भिडल्या.
आप आदमी पक्ष रात्रीच स्थायी समितीच्या सदस्यांची निवड व्हावी म्हणून ठाम राहिला होता. तर सौरभ भारद्वाज यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत सर्वोच्च न्यायालयाने सभागृहाच्या पहिल्या बैठकीतच निवडणूका घेण्यास सांगितले आहे, त्यामुळे आम्ही सभा पुढे ढकलू शकत नाही, असे म्हटले होते.