उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची भाजपाने पुन्हा उडवली टर, असा मारला टोमणा…..

मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत ठाकरे यांनी भाजपा आणि महाराष्ट्रातील सरकारवर टीका केली. याला आता भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे. “घरात बसून टोमणे कोणालाही मारता येतात. हिंमतवान लोक समोरासमोर येऊन चर्चा करतात” असं म्हणत एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. “उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी नुकतीच स्वत:च्याच पॉडकास्ट चॅनेलला मुलाखत दिली. तेही स्वत:ला विश्वगुरू मानणाऱ्या संजय राऊत यांना. हे म्हणजे माझाच बॉल, माझीच बॅट आणि माझेच मैदान असं आहे. बॉल टाकणारा भिडूही माझाच, म्हणजे आऊट होण्याचा सवालच नाही,” अशी टीका भाजपाने केली आहे.

भाजपा महाराष्ट्रने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “घरात बसून मुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या नव्हे, तर मुख्यमंत्रीपद उपभोगणाऱ्या नेत्याकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार? स्वत:च्या नाकर्तेपणाला भावनांची झालर लावणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत व्हिक्टिम कार्ड खेळलं. पण, उद्धव ठाकरे यांनी जनतेला मुर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नये. कारण, जनतेच्या मनातही अनेक प्रश्न सतावत आहेत. सत्तेसाठी तुम्ही बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाशी प्रतारणा केली, तेव्हाच जनतेचा तुमच्यावरील विश्वास संपला.”

“आताही तुम्ही राहुल गांधींचे गोडवे गात आहेत. हे तेच राहुल गांधी आहेत, ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर शाब्दिक हल्ले केले. त्यांचा आणि हिंदुत्वाचा अपमान करणारे, आता तुम्हाला गोड वाटू लागले आहेत. सोनिया गांधींना परदेशी म्हणून कायम हिणावलं, त्या तुम्हाला जवळच्या वाटू लागल्या आहेत. उद्धव ठाकरे इतके सत्तांध झालेत की, महाराष्ट्रातील जनतेचा कौल डावलला आणि आजही डावलत आहेत. स्वत:च्या वडिलांचे विचार, संस्कार, भाजपाशी मित्रत्वाचे नाते उद्धव ठाकरेंनी डावलले. आणि मुख्यमंत्रीपद भोगताना जनतेचा विश्वासही तोडला.”

“उद्धव ठाकरेंनी घरात बसून मुलाखती झोडण्यापेक्षा हिंमत असेल, तर समोर या. चर्चा करा आणि मुंबईकरांच्या मनातील प्रश्नांची उत्तर द्या. अडीच वर्षांच्या कार्यकाळात विकास कामे का थांबवली? त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तुम्ही करणार का? मुंबईला काय घातक आहे? मुंबई महापालिका निवडणुका कोण न्यायालयात गेल्याने रखडल्या आहेत? मुंबईला कोणी किती वर्षे लुटलं? मुंबईतून काय बाहेर गेलं आणि काय आलं? क्रिकटचे सामने मुंबई बाहेर खरंच जाणार का? मुंबईकरांच्या अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागणार आहे. बातोसो सिर्फ वक्त गुजरता है, काम करने के लिए बाहर निकलना जरुरी है” असं म्हणत भाजपाने उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.