तळोदा : अक्कलकुवा तालुक्यातील वनक्षेत्रांमध्ये बिबट्यांसह हिंस श्वापदांचा मुक्त संचार सुरू असून, त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. तळोदा तालुक्यात तीन-चार दिवसांपूर्वी २४ तासांच्या अंतराने पुनर्वसित सरदार नगरसह गणेश बुधावल येथे बिबट्याच्या हल्ल्यांत महिलेसह मुलगी मृत्युमुखी पडली होती. त्यामुळे वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. आता बिबट्यांच्या बंदोबस्ताबाबत भाजप आक्रमक झाला असून, जिल्हाधिका-यांसह वनसंरक्षकांचे निवेदनातून लक्ष वेधले आहे.
अक्कलकुवा तालुक्यात जीवितहानी होण्याची भीती निर्माण झाल्याने वेळीच वनविभागाने हिंस श्वापदांसह बिबट्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीचे निवेदन भाजपचे अक्कलकुवा विधानसभा निवडणूकप्रमुख नागेश पाडवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह वनसंरक्षकांना दिले आहे. तळोदा तालुक्यातील गणेश बुधावल येथे शनिवारी (१५ मार्च) बिबट्याच्या हल्ल्यात ४५ वर्षीय महिला मृत्युमुखी पडली. तेथे तीन पिंजरे लावण्यात आले. बिबट्यांना जेरबंद करण्यात अजूनही वनविभागाला यश आले नाही.
सरदारनगर येथे सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. तेथे रविवारी (१६ मार्च) मांजरा पावरा यांच्या मक्याच्या शेतात दीपमाला नरसिंग तडवी (क्य १०) मैत्रिणीसह शेतात मका घ्यायला गेली असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला करून ठार केले. वनविभागाने रविवारी (१६ मार्च) दुपारी दोनच्या सुमारास पिंजरा लावला. परत दुसरा पिंजरा लावण्यासाठी सायंकाळी सहाच्या सुमारास गेले असताना बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे दिसून आले. तत्काळ शहाद्याहून ड्रोन कॅमेरा मागविण्यात आला. रात्री बिबट्याचा मुक्त संचार होत असल्याचे दिसून आले. त्यानंतर वनकर्मचाऱ्यांना रात्री बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. तरीही वनविभागाने हिंस श्वापदांसह बिबट्यांचा वावर सुरूच असून, नरभक्षक बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
शेतशिवारात वावरणारे शेतकयांसह आदिवासी बांधवांमध्ये बिबट्याची दहशत आहे. आता अक्कलकुवा तालुक्यातील वनक्षेत्रांत हिंस्र श्वापदांसह बिबट्यांचा मुक्त संचार वाढला असल्याचे दिसून आले आहे. आता वनविभागाविरोधात भाजप आक्रमक झाला आहे. भाजपचे नागेश पाडवी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अक्कलकुवा तालुक्यातील वनक्षेत्रांमध्ये विशेषतः नर्मदानगर, वाण्याविहीर, जानीआंबा, सोजदान, महुखाडी, खापर, मोरांबा यांसह तालुक्यातील वनक्षेत्रांमध्ये बिबट्यांसह अन्य वन्यप्राण्यांचा मुक्त संचार सुरू असल्याने परिसरातील शेतकरी व आदिवासी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण असून, शेतकरी शेतात जीव मुठीत धरून कामे करीत आहेत. काही ठिकाणी शेतकरी शेतीकामांसाठी जात नसल्याने त्यांचे नुकसान होत आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करीत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी आर्थिक फायद्यासाठी इतर कामांकडे अधिक लक्ष देत असून, तालुक्यातील या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोपही निवेदनात करण्यात आला असून, जीवितहानी होण्यापूर्वीच वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनातून केली आहे.
हिंस श्वापदांच्या बंदोबस्तासाठी विशेष मोहीम राबवा
गेल्या मॉन्सूनमध्ये समाधानकारक पर्जन्यमान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात बागायती कपाशीसह ज्वारी, बाजरी तसेच मका आदी खरीप व रब्बी हंगाम संपुष्टात येत आहे. त्यातच शेतशिवार, माळरान मोकळे होत असल्याने पिकांच्या आडोशाला असलेले रानमांजर, नीलगायी वा बिबटे आदी श्वापदांच्या हत्त्यांमुळे पशुधनासह आदिवासी बांधवांमध्ये दहशत निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. वनविभागाने आता पंचनामे करून कागद न रंगवता शेतशिवारात मुक्त संचार असलेल्या बिबट्यांचा बंदोबस्त करावा. यासाठी विशेष मोहीम राबवायला हवी.