Chandrashekhar Bawankule : एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ भूमिकेनंतर काय म्हणाले बावनकुळे ?

Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्रात महायुतीच्या सरकार स्थापनेच्या हालचालींना आता वेग आला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा आपला दावा सोडला असून, भाजपाच्या मुख्यमंत्र्यासाठी आपलं समर्थन असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेनंतर नागपुरात भाजपाची पत्रकार परिषद झाली. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानत, कौतुक केले.

ते म्हणाले की, कालपासून विरोधी पक्षातील लोक एकनाथ शिंदे नाराज असल्याचा आवाज करत होते. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या कर्तृत्ववान व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण महायुतीचे नेते म्हणून शिंदे यांनी पत्रकारांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसमोर आणि राज्यातील सर्व जनतेसमोर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.

मुख्यमंत्रीपदाबाबत मोदी-शहा आणि केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल त्याला पूर्ण पाठिंबा असेल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. महायुतीच्या रूपाने त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शिंदे यांनी राज्याच्या विकासासाठी काम केले आहे. त्यांचे कार्य आपण पाहत आहोत, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

शिंदे यांच्या सारखा तगडा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला. त्यांनी आपल्या कार्यातून महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम केले. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, सामाजिक न्याय, सामाजिक समता, आदिवासींसाठी त्यांनी काम केले. एकनाथ शिंदे हे महायुतीचा चेहरा असल्याने तिघांनी (देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार) मिळून विकासकामे केली. मोदींच्या नेतृत्वाखाली विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र मजबूत करण्यात शिंदे यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

शिंदे, फडणवीस आणि अजितदादांचे पूर्वीचे विजय आहेत. महायुतीला मोठा जनादेश मिळाला आहे. त्यांनी महायुती मजबूत करण्याचा प्रयत्न केला. शिंदे साहेब रडणारे नाहीत. ते लढणारे आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले तेव्हा ते रडले नाहीत. ते लढत बाहेर आले. त्यांनी लढाऊ राजकारणी म्हणून काम केले.

महायुती आज  मजबूत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांना आज एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे यांच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे. महायुती या नात्याने शिंदे यांनी ज्या भूमिका घेतल्या त्या योग्य आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो, असे बावनकुळे यांनी सांगितले.