गोंडगाव प्रकरण : भाजप नेत्या चित्रा वाघ संतापल्या, म्हणाल्या ‘एक आई म्हणून मला…’

जळगाव : भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे एका आठ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेनंतर भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी पीडित मुलीच्या परिवाराची आज सांत्वनपर भेट घेतली. त्यांची सहानुभूतीपूर्वक चौकशी करुन मुलीच्या आरोपीस कठोर शिक्षा केली जाईल, कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला सोडले जाणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं.

त्या पुढे म्हणाल्या की, ‘एक आई म्हणून मला विचाराल तर मी नक्की हे सांगेन की, अशा नराधमांना भर चौकामध्ये फाशी द्यायला पाहिजे. मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणाऱ्या या नराधमाला भर चौकात फाशी शिक्षा द्यायला पाहिजे, असे कृत्य त्याने केले आहे. मात्र कायद्याच्या चौकटीत राहून त्याला फाशीची शिक्षा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी पीडित परिवारासाठी दिलेली आर्थिक मदत परिवाराच्या स्वाधीन केली. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळायची असेल तर शासन, पोलीस यंत्रणेसोबत समाजानेही सजग राहण्याची आवश्यकता असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटल आहे. शासन पातळीवर महिलांच्या सुरक्षेसाठी कायदे सक्षम आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी लक्ष देणे महत्वाचे असल्याचं वाघ यांनी म्हटलं आहे.

समाजात अशा विकृती वाढत असून अशा विकृती ठेचण्यासाठी आपण समाज म्हणून सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. ती फक्त या गावची मुलगी नाही किंवा त्या आई-वडिलांची मुलगी नव्हती, तर राज्याची मुलगी होती आणि अशा हजारो मुली वाचवण्यासाठी जे जे काही करता येईल, तेथे निश्चितपणे सरकार म्हणून उभे राहत आहोत. सरकार, पोलीस दक्ष असून समाज म्हणून आपण कुठे कमी पडतोय का, हे पाहणं फार गरजेचे आहे. सगळ्यांनी एकत्रित येऊन या मुलीच्या रक्षणाची जबाबदारी घेणं गरजेचं असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. पुण्याच्या घटनेत दोन सजग मुलांनी मुलीचा जीव वाचवला, अशी सजगता प्रत्येकाने दाखवणे गरजेचे आहे. एक आई म्हणून झालेल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून जे जे काही करता येईल, त्या त्या खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.