भाजप नेते नावासमोर लिहितायं ‘मोदी का परिवार’; जाणून घ्या काय आहे कारण

नवी दिल्ली : भाजपच्या देशभरातील नेत्यांनीही आपल्या नावासमोर ‘मोदी का परिवार’ असं लिहिण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे. मात्र भाजपाचे सगळे नेते त्यांच्या नावासमोर मोदी का परिवार असे का लिहित आहेत? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर आपण त्याचं उत्तर जाणून घेवूयात.

इंडिया आघाडीची काल बिहारमधील पाटणा इथं सभा पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना राजदचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. “नरेंद्र मोदी हे हिंदू नाहीत, कारण प्रत्येक हिंदू आपल्या आईचा मृत्यू झाल्यानंतर केस आणि दाढी काढतो. मात्र मोदींनी असं केलं नाही. ते घराणेशाही म्हणत लोकांवर टीका करतात, मात्र त्यांना कुटुंबच नाही,” असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं होतं.

लालू यांच्या या टीकेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. “देशातील प्रत्येक गरीब व्यक्ती माझं कुटुंब आहे. ज्याचा कोणी नाही त्याचा मोदी आहे, असं मोदींनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भाषणानंतर भाजप नेते व कार्यकर्त्यांनी त्यांचे सोशल मीडियावरील प्रोफाईल बदलले आहेत. त्यांनी स्वत:च्या नावापुढे मोदी का परिवार लिहित, विरोधकांना प्रतिउत्तर दिलं आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौकीदार चोर है, असं म्हणत हल्ला चढवला होता. या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देत ‘मै भी चौकीदार’ ही मोहीम देशभर राबवण्यात आली होती. भाजपच्या प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आपल्या नावासमोर ‘मै भी चौकीदार’ असं लिहिलं होतं. त्यानंतर यंदाच्या निवडणुकीतही भाजपने ‘मोदी का परिवार’ ही मोहीम राबवत २०१९ ची पुनरावृत्ती केल्याचं दिसत आहे.