तरुणांना वाचवण्यासाठी भाजपा आमदाराची समुद्रात उडी; वाचून येईल अंगावर काटा

तरुण भारत लाईव्ह । अहमदाबाद : समुद्रकिनारी फिरायला आलेले चार मित्र समुद्रात पोहण्यासाठी उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने आणि मोठ्या लाटांमुळे हे चौघेही खोल समुद्रात खेचले गेले. या चौघांनाही आरडाओरड करुन समुद्रकिनार्‍यावर असलेल्या लोकांकडे मदत मागण्यास सुरुवात केली. या चौघांचे आवाज ऐकून समुद्रकिनार्‍यावरील लोकांनी मदत करण्यासाठी धाव घेतली. यावेळी झालेला आरडाओरड ऐकून जवळ उपस्थित असलेल्या भाजपा आमदाराने समुद्राकडे धाव घेतली. स्वत: खोल पाण्यात उडी मारली. त्यानंतर जे घडलं ते पाहून अनेकांच्या अंगावर काटा उभा राहिला.

पटवा गावातील समुद्रकिनाऱ्याजवळ कल्पेश सियाल, विनय गुजारीया, निकुल गुजरीया आणि जीवन गुजरीया हे चौघे भटकंतीसाठी आले होते. बुधवारी सायंकाळी या चौघांनी समुद्रात पोहण्यासाठी जाण्याचं ठरवलं. त्यानुसार ते समुद्रात उतरले. मात्र मोठ्या लाटांमुळे हे चौघेही खोल समुद्रात खेचले गेले. या चौघांनाही आरडाओरड केला. उपस्थितांनी पोलिसांनाही यासंदर्भातील माहिती कळवण्यात आली. मात्र पोलीस येईपर्यंत वाट पाहण्याआधीच या समुद्रात अडकलेल्या तरुणांना वाचवण्यासाठी स्थानिकांकडून प्रयत्न सुरु झाले.

समुद्रकिनार्‍यावर हा संपूर्ण प्रकार सुरु असतानाच भाजपाचे स्थानिक आमदार हिरा सोलंकी तिथेच होते. सोलंकी यांना ४ तरुण बुडत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने समुद्रकिनार्‍याकडे धाव घेतली. स्वत:ला उत्तम पोहता येत असल्याने त्यांनी त्यांनी पुढचा मागचा कोणताही विचार न करता थेट समुद्रात उडी मारली. सोलंकींबरोबर इतरही काही तरुणांनी समुद्रात उड्या मारल्या.

अन्य लोक बोटीने या तरुणांच्या दिशेने गेले. त्यांच्या प्रयत्नांनी तिन तरुणांना वाचविण्यात यश आलं. मात्र दुर्देवाने यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. मरण पावलेल्या मुलाचं नाव जीवन गुजरीया असं आहे. स्वत: आमदाराने पुढाकार घेत या तरुणांचा जीव वाचवल्याने भाजपा आमदारावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.