MLA Rajesh Padvi : राज्य विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. अशात बऱ्याच राजकीय उलथापालथी घडतील, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. दरम्यान, शहादा-तळोदा विधानसभेचे भाजप आमदार राजेश पाडवी भाजप सोडणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून जिल्ह्यात सुरू होती. आता या चर्चांना आमदार पाडवींनी पूर्णविराम दिलाय.
काय म्हणाले आमदार पाडवी ?
”माझ्या सामाजिक व राजकीय जन्म भारतीय जनता पक्षात झाला असून परिसरामध्ये विकासाची नांदी करण्याचे ध्येय घेऊन नियमित प्रेरित होतो. प्रशासकीय अधिकारी असताना नेहमीच सामाजिक कार्याच्या माध्यमातून बदल घडविण्यासाठी राजकीय शक्तिंसोबत असावे लागते. म्हणून भारतीय जनता पक्षाची राष्ट्राप्रती, विश्वाप्रती असणारी सखोल विचारधारा मला नेहमीच आवडत राहिली आहे. म्हणून मी देव, देश, धर्माच्या कार्यासाठी या विचारधारेचा पूर्वीपासून अनुयायी आहे व यापुढे देखील याच प्रमाणे नियमित राहील यात तीळ मात्र शंका नाही”, असं आमदार पाडवी यांनी म्हटलं आहे.
ते पुढे म्हणाले की, ”मागील काही दिवसांपासून अन्य विचारधारेच्या पक्षाच्या संपर्कात आहे असे खोटे वातावरण विरोधकांच्या वतीने तयार करण्यात येत आहे. परंतु मी ठरवलेल्या विकासाचा दृष्टिकोन मला स्पष्टपणे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दिसतो. या शासनाने जनतेसाठी केलेले धोरण कल्याणकारी आहे व मी त्याबाबत पूर्णपणे सहमत असल्यामुळे कुठेही जाऊन राजकीय बदल करण्याच्या मानसिकतेमध्ये अथवा कोणताही अन्य पक्षाच्या किंवा पदाधिकाऱ्यांच्या मी संपर्कात नाही. यामुळे कोणीही कोणत्याही अफवांना बळी पडण्याचे काहीही कारण नाही, असं आमदार पाडवी यांनी म्हटलं आहे.
माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्षाने प्रशासकीय सेवेतून एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रभारी केले पक्षाने माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला मी त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे”. अशी भूमिकाही राजेश पाडवी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडली आहे.