पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन

Girish Bapat : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट यांची प्राणज्योत मालवली असून, पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे वय 72 होते. अंत्यविधी संध्याकाळी 7  वाजता वैकुंठ स्मशान भूमीत होणार आहे.

दरम्यान, 1973 पासून ते राजकारणात सक्रिय होते. पुण्यात भाजपची यशस्वी वाटचाल करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. पुण्याची ताकद गिरीश बापट अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.  पुण्यातील कसबा मतदार संघात आणि इतर पुण्यात भाजप पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली होती.

महिन्याभरापूर्वी दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पोटनिवडणुक झाली. या निवडणुकीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. सुरुवातीला प्रकृतीमुळे प्रचारात सक्रिय राहणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र पक्षनिष्ठा जपत ते पोटनिवणुकीसाठी ऑक्सिजन लावून आणि व्हिलचेअरवर भाजपच्या मेळाव्यासाठी पोहचले होते.

त्यांनी आजारी असतानाही मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर गुढीपाडव्यानिमित्त कसबा गणपतीसमोर गिरीश बापटांच्या खासदार निधीतून करण्यात आलेल्या विकास कामांच्या उद्घाटनाला गिरीश बापट यांच्याकडून कॉंग्रेसचे विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर आणि त्यांचे भाजपमधील प्रतिद्वंद्वी हेमंत रासने यांना आमंत्रित करण्यात आले होते. हा सर्वसमावेशकपणा हेच गिरीश बापट यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य होते आणि चाळीस वर्षांच्या यशस्वी राजकीय कारकीर्दीचे रहस्य होते.