BJP-NCP : भाजप ३० ते ३५ हून अधिक जागा लढवण्यावर ठाम : राष्ट्रवादीला केवळ चारच जागा

BJP-NCP  : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात होणाऱ्या बैठकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी होत आहेत. यावेळी जास्तीत जास्त जागा पदरी पाडून घेण्याचा शिंदे-पवारांचा प्रयत्न होता. परंतु भाजप ३० ते ३५ हून अधिक जागा लढवण्यावर ठाम असून शिवसेना-राष्ट्रवादीला एक आकडी जागा मिळण्याची चिन्हं आहेत.

राष्ट्रवादी पक्ष राज्यात १२ ते १३ जागा लढविण्यासाठी इच्छुक असून जास्तीत जास्त जागांवर पक्षाने निवडणूक लढवावी, अशी एकमुखी मागणी यावेळी कार्यकर्त्यांकडून पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्याकडे करण्यात आली. नुकतीच छगन भुजबळ यांनीही राष्ट्रवादीला शिवसेनेइतक्या जागा सोडण्याची मागणी भाजपकडे केली होती. परंतु ही मागणी प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता कमी आहे.

दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासोबत एक बैठक झाली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रफुल पटेल यांच्यासोबत शाहांची स्वतंत्र बैठक झाली. अजित पवार ज्यावेळी महायुतीत सहभागी झाले, त्यावेळी त्यांना ९-९० चा फॉर्म्युला दिल्याचं बोललं जातं. म्हणजेच लोकसभेच्या ९, तर विधानसभेच्या ९० जागा देण्याचं सूत्र ठरलं होतं. परंतु भाजपने आता राष्ट्रवादीला केवळ चारच जागा देण्याची तयारी दाखवली आहे.

बारामती आणि रायगड या जागा निश्चित

बारामती आणि रायगड या जागा निश्चित मानल्या जात आहेत. बारामतीतून सुनेत्रा पवार आणि रायगडमधून सुनील तटकरे यांचं नावही जवळपास फिक्स आहे. तर दुसऱ्या दोन जागांवर दोन दिवसांनी बैठक होणार आहे. बारामती, शिरुर, सातारा, रायगड, गडचिरोली, परभणी, भंडारा-गोंदिया, नाशिक, दिंडोरी, ईशान्य मुंबई, धाराशिव, आणि हिंगोली या १२ जागांबाबत राष्ट्रवादीची चाचपणी झाली आहे.