BJP Politics : इथल्या उमेदवारांवर होणार विचारमंथन; ‘या’ दिवशी होणार शिक्कामोर्तब?

राजस्थान विधानसभा निवडणुकीबाबत राजकीय नाडी जाणून घेण्यासाठी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरुवारी जयपूरमध्ये दोन दिवसांच्या बैठकीनंतर दिल्लीत परतले. यावेळी नड्डा-शहा यांनी राज्यातील सर्व वरिष्ठ नेत्यांची बैठक घेऊन उमेदवारांच्या नावांवर विचारमंथन केले असून आता दिल्लीत अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. हे पाहता भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची 1 ऑक्टोबर म्हणजेच रविवारी बैठक बोलावण्यात आली असून, त्यात राजस्थानसह मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली जाणार आहे.

रविवारी संध्याकाळी होणाऱ्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत राजस्थानमधील उमेदवारांच्या नावांवर चर्चा होणार आहे. यासोबतच छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील उमेदवारांच्या नावांवरही विचारमंथन केले जाणार आहे.

राजस्थान निवडणुकीसाठी भाजपने अद्याप उमेदवारांची एकही यादी जाहीर केलेली नाही, तर मध्य प्रदेशसाठी तीन आणि छत्तीसगडसाठी एक याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे राजस्थानमधील उमेदवारांची पहिली यादी 1 ऑक्टोबरच्या बैठकीनंतर कोणत्याही दिवशी जाहीर केली जाऊ शकते.

राजस्थान निवडणुकीसंदर्भात भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी संध्याकाळी जयपूरला पोहोचले होते. बुधवारी रात्री उशिरापर्यंत दोन्ही केंद्रीय नेत्यांनी राजस्थानच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरूच ठेवल्या.

नड्डा आणि शहा यांनी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, भाजप प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, खासदार राज्यवर्धन सिंह राठोड आणि राज्यातील इतर वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या काळात तिकीट वाटप, निवडणुकीची रणनीती, प्रचार आदी विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.