शरद पवारांनी केलेल्या टिप्पणीवर भाजपानं दिलं प्रत्युत्तर

पुणे : राज्याच्या राजकारणात सध्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीच्या निकालाची चर्चा पाहायला मिळत आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात कॉंग्रेसने गुलाल उधळल्यानं भाजप नेत्यांवर टीका होताना दिसत आहे. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाजपवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता शरद पवारांनी केलेल्या टिप्पणीवर भाजपानं प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपच्या बालेकिल्ल्यात कॉंग्रेसने गुलाल उधळल्यानंतर शरद पवार यांनी “कसबा आणि चिंचवड पोट निवडणूकीच्या निकालावर बोलताना आम्ही जी मतांची माहिती घेतली, त्यावरून तर फक्त दोन ठिकाणी भाजपाला जास्तीची मतं मिळाली. नाहीतर सरसकट सगळीकडे भाजपा मागे आहे. शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ अशा बहुसंख्य ठिकाणी रवींद्र धंगेकरांना जास्तीची मतं मिळाली. हा बदल आहे. हा बदल पुण्यात होतोय याचा अर्थ लोक वेगळ्या विचारात आहेत,” हे स्पष्ट होत असल्याचे विधान केले होते.

शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी “चिंचवडमध्ये दोघांच्या मतांची बेरीज केली तरी आम्ही अधिक आहोत. आम्ही ५१ टक्क्यांची लढाई जिंकलीये. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप ५१ टक्क्यांची लढाई जिंकून निवडून आल्या आहेत. एकीकडे ४ टक्के मागे पडलो आहोत. ही ४ टक्के मतं भरून काढणं ही आमची जबाबदारी आहे. पुन्हा जनतेमध्ये जाऊ. पुन्हा जनतेला विश्वासात घेऊ. काही आमच्याकडून चुकलं असेल तर ते दुरुस्त करू” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

तसेच “शरद पवारांनी नुकत्याच झालेल्या तीन राज्यांचे निकाल बघितले नसतील. त्यांनी आज ते बघून घ्यावेत. संपूर्ण काँग्रेस साफ झालीये. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून पक्ष जोडण्याचा प्रयत्न केला. पण उलट पक्ष कमी झाला. तीन राज्य हातातून गेले. शरद पवार जे सांगत आहेत ते कार्यकर्त्यांना आवाहन करण्यासाठी सांगत आहेत,” असा टोलाही त्यांनी लगावला आहे.