शिर्डीत भाजपचे आज राज्यस्तरीय अधिवेशन; आगामी निवडणुकींच्या रणनितीवर होणार चर्चा !

राज्यात महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपरिषद निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आज, रविवार १२ जानेवारी रोजी, शिर्डीत भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या महत्त्वाच्या अधिवेशनाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

यावेळी व्यासपीठावर संविधान पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अधिवेशनानिमित्त शिर्डीत १ हजार व्हीआयपींची उपस्थिती असून, स्वागतासाठी शेकडो फलक, ५० कमानी, आणि २५०० भाजपचे झेंडे लावण्यात आले आहेत. याशिवाय, १५ हजार भाजप पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकींसाठी मार्गदर्शन दिले जाणार आहे.

भाजपच्या या अधिवेशनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांसह अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनिती ठरवण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वाचे मानले जात आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी साई दर्शन घेतले. आज रविवारी साई मंदिर परिसरात भाजप पदाधिकारी आणि भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. आता या अधिवेशनातून आगामी निवडणुकांसाठी भाजपची कोणती रणनिती ठरते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.