पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये भाजप २७ वर्षांचा रेकॉर्ड तोडणार!

अहमदाबाद : गुजरात निवडणुकीत भाजपाची रेकॉर्डब्रेक विजयाकडे विक्रमी वेगाने घोडदौड सुरु आहे. सुरुवातीला आलेल्या मतमोजणीतील आकडेवारीनुसार गुजरातमध्ये भाजप तब्बल १५० जागांवर आघाडीवर आहे. शेवटपर्यंत भाजपाची ही घौडदौड अशीच कायम राहिली तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये भाजप यंदा गेल्या २७ वर्षातील रेकॉर्ड मोडत नवा रेकॉर्ड बनवू शकते. काँग्रेस उमेदवार केवळ २० जागांवर आघाडी घेत आहेत. विशेष म्हणजे आम आदमी पक्षानेही यंदाच्या निवडणुकीत एंट्री करत ७ जागांवर आघाडी घेतली आहे.

राज्यातील १८२ मतदार संघांतील मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली असून भाजपला मोठी आघाडी मिळाली आहे. गुजरातमध्ये भाजपच सत्तेत येणार हे या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. गेल्या २७ वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपचे कमळच सत्तेवर आहे. त्यानुसार, आत्तापर्यंतच्या विजयानुसार २००२ मध्ये गुजरातमध्ये भाजपला सर्वाधिक १२७ जागांवर विजय मिळाला होता. आजपर्यंतचा हा सर्वात मोठा विजय होता. मात्र, यंदा १५० जागांवर भाजपला विजय मिळण्याचा अंदाज आहे, त्यामुळे, यंदा विधानसभा निवडणुकीत भाजप इतिहास रचणार आहे. गुजरात विधानसभेच्या निवडणुकांचा इतिहास पाहिल्यास भाजपला यंदा मिळत असलेलं यश हे सर्वात मोठं असल्याचं दिसून येतं.

भाजपने गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत १९९५ पासून सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे. मात्र, सन २०१७ च्या गत पंचवार्षिक निवडणुकीत भाजपला १०० जागांवर विजय मिळवणं कठीण बनलं होतं. भाजपने ९९ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. मात्र, काँग्रेसने चांगली आगेकूच केल्याचं पाहायला मिळालं. कांग्रेसने गत पंचवार्षिक निवडणुकीत ७९ जागा जिंकल्या भाजपला टक्कर दिली. त्यामुळेच, यंदाच्या निवडणुकांची उत्सुकता काँग्रेसला अधिक आहे.

आकडे बोलतात…
१९९५ :   भाजप १२१      काँग्रेस ४५
१९९८ :   भाजप ११७     काँग्रेस ५३
२००२ :   भाजप १२७     काँग्रेस ५१
२००७ :   भाजप ११७     काँग्रेस ५९
२०१२ :   भाजप ११५      काँग्रेस ६१
२०१७ :   भाजप ९९       काँग्रेस ७९