महाविकास आघाडीला धक्का; विधान परिषदेत भाजपचा पहिला विजय

रायगड : शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा पहिला निकाल आला आहे. कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. त्यांनी शेकापचे बाळाराम पाटील यांना पराभूत केलं. बाळाराम पाटील यांचा पराभव हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. शेकापच्या साथीला ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असून सुद्धा हा पराभव झाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला.

कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे बाळाराम पाटील आणि भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात सरळ लढत होती. या निवडणुकीत बाळाराम म्हात्रे यांना २०८०० मते मिळाली. तर शेकापचे बाळाराम पाटील यांना ९५०० मते मिळाली. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी ११,३०० मताधिक्य घेत आपला विजय नोंदवला आहे. बाळाराम पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा होता. तरीही पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.