अग्रलेख
भाजपाचा 44 वा स्थापना दिन सोहळा दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आणि खासदार यावेळी उपस्थित होते. कोणत्याही राजकीय पक्षाच्या जीवनात 44 वर्षांचा काळ हा खूप मोठा नसला, तरी या काळात भाजपाने जी गरुडभरारी घेतली, ती अतिशय कौतुकास्पद आणि अभिमानास्पद अशीच म्हणावी लागेल. भाजपा ज्या राष्ट्रवादी विचारधारेचे प्रतिनिधित्व करीत आहे, ती विचारधारा राजकारणात येऊन जवळपास 70 वर्षे झाली. स्वातंत्र्यानंतर काही वर्षांतच राष्ट्रवादी विचारधारा भारतीय जनसंघाच्या रूपात देशात कार्यरत झाली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी आणिबाणी लादली नसती तर कदाचित देशाचे राजकीय चित्र वेगळे राहिले असते; भाजपाची स्थापनाच झाली नसती. जनसंघच आजही देशाच्या राजकारणात सक्रिय राहिला असता. पण देशावर आणिबाणी लादणार्या इंदिरा गांधींचा आणि पर्यायाने काँग्रेसचाही मुकाबला करण्यासाठी भारतीय जनसंघ, भारतीय लोकदल, संघटन काँग्रेस आणि सोशालिस्ट पक्ष यांनी एकत्र येत जनता पक्षाची स्थापना केली. 1977 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला; जनता पक्षाचे सरकार आले आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. जनता पक्षात विलीन झालेल्या सर्व पक्षांच्या नेत्यांच्या जनसंघाच्या नेत्यांचा अपवाद वगळता पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षा वाढल्यामुळे जनता पक्षाचे बारा वाजले. जनता पक्षाचे हे ताल पाहून पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या नेत्यांनी जनता पक्षातून बाहेर पडत भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. त्यामुळे BJP Sthapna din भाजपाच्या स्थापनेचे श्रेय इंदिरा गांधींना द्यायला हवे. त्यांनी आणिबाणी लादली नसती तर देशातील चार पक्षांना एकत्र येत जनता पक्षाची स्थापना करावी लागली नसती आणि जनता पक्षातील पूर्वाश्रमीच्या काही पक्षांच्या नेत्यांनी आपल्या महत्त्वाकांक्षा मर्यादेत ठेवल्या असत्या, तर पुढचे सगळे रामायण घडले नसते.
भाजपाचा देशव्यापी विस्तार होण्यात राममंदिर आंदोलनाचे तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज अयोध्येत भव्य-दिव्य अशा राममंदिराच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. 2024 च्या जानेवारी महिन्यात मंदिराच्या गर्भगृहात रामललाची प्राणप्रतिष्ठा झालेली असेल. विशेष म्हणजे यावेळी भाजपाचा स्थापना दिन हनुमान जयंतीच्या दिवशीच आला, हा लक्षणीय योगायोग म्हटला पाहिजे. मोदी यांनी आपल्या भाषणात याचा नेमका उल्लेख केला. भाजपा हनुमानजीप्रमाणे सर्व काही करू शकतो, सर्वांसाठी करू शकतो, पण स्वत:साठी काही करत नाही, भाजपाचेही तसेच आहे. हनुमानजी हे भाजपाचे प्रेरणास्थान आहे, असे ते म्हणाले. या 44 वर्षांतील भाजपाचा प्रवास हा सोपा नव्हता, तर अतिशय आव्हानात्मक होता. कारण भाजपाची स्थापना झाली त्यावेळी काँग्रेस राजकीयदृष्ट्या अतिशय शक्तिशाली होती. देशात आणि देशातील अनेक राज्यांत काँग्रेसची सत्ता होती. त्या तुलनेत आधीचा जनसंघ आणि नंतरचा भाजपा राजकीयदृष्ट्या अतिशय कमजोर होता. जनसंघाला सुरुवातीच्या काळात तर काँग्रेस विरोधात लढण्यासाठी उमेदवारही मिळत नव्हते. जे उमेदवार मिळायचे ते हरण्यासाठीच निवडणूक लढवत होते. भाजपाची सुरुवातीच्या दिवसातील स्थितीही यापेक्षा वेगळी नव्हती. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर 1984 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाला फक्त दोन जागा जिंकता आल्या होत्या. लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयींसारख्या भाजपाच्या दिग्गज नेत्यांचा तेव्हा पराभव झाला होता. त्यामुळे भाजपाला आजचे अच्छे दिन पाहायला मिळतील, अशी कल्पनाही तेव्हा कोणी केली नव्हती. भाजपा तेव्हा फक्त निवडणूक हरला होती, पण आपला आत्मविश्वास भाजपाने गमावला नव्हता. त्यामुळेच 2 वरून 300 पारचा पल्ला भाजपाला फक्त 30 वर्षांत गाठता आला, तोही स्वबळावर! ही अशक्यप्राय गोष्ट शक्य झाली ती नरेंद्र मोदी यांच्या करिश्माई नेतृत्वाने! ‘मोदी है तो मुमकिन है’ असे जे म्हटले जाते, ते उगीच नाही. भाजपाच्या निवडणुकीतील यशाच्या मंदिरावर नरेंद्र मोदी यांनी सोन्याचा कळस चढवला, हे निर्विवाद सत्य आहे. पण त्यासाठी जनसंघ आणि भाजपाच्या हजारो कार्यकर्त्यांनी या मंदिराच्या पायात ‘असू अम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभवणे हेच अमुचे शील’ असे म्हणत आपल्या मेहनतीचे, त्यागाचे आणि सर्वस्वाचे बलिदान केले होते. भाजपाला आज जो विजय मिळाला, ते या कार्यकर्त्यांचे परिश्रमाचे आणि समर्पणाचे फळ आहे. सुरुवातीच्या काळात जनसंघ आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचा मजबूत पाया रचला. त्यामुळे आज विजयाचे शिखर गाठणे भाजपाला शक्य झाले आहे. ‘आधी देश, मग पक्ष आणि सर्वांत शेवटी मी’ या भूमिकेतून भाजपात सर्वजण काम करीत असतात. भाजपाच्या विजयाचे रहस्य यात दडले आहे.
2014 नंतरच्या सलग दोन लोकसभा निवडणुका भाजपाने जिंकल्या. आता 2024 ची तिसरी निवडणूक जिंकत भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विजयाची हॅट्ट्रिक करेल, यात शंका नाही. विशेष म्हणजे 2014 नंतर 2019 च्या निवडणुकीत भाजपाच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तर 400 चा पल्ला गाठण्याचा भाजपाचा निर्धार आहे. देशातील वर्तमान राजकीय स्थिती पाहता हे अशक्य दिसत नाही. कधीकाळी देशात भाजपाची जी स्थिती होती, तीच स्थिती आज काँग्रेसची झाली आहे. अनेक वर्षं देशावर राज्य केलेल्या काँग्रेसला सलग दोन निवडणुकांत लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळेल एवढ्या जागाही जिंकता आल्या नाही. दुसरीकडे भाजपा देशातील एकेक राज्य जिंकत चालले आहे. देशातील जवळपास तीन चतुर्थांश राज्यात भाजपाची वा भाजपाच्या मित्रपक्षांची सत्ता आहे. सद्य:स्थितीत भाजपाला पराभूत करण्याची क्षमता काँग्रेससह देशातील कोणत्याही राजकीय पक्षात नाही. देशातील सर्व राजकीय पक्ष एकत्र आले तरी ते भाजपाचा पराभव करू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. भाजपाला पराभूत करण्यासाठी काँग्रेसला घेऊन वा काँग्रेसशिवाय विरोधी पक्षांची आघाडी तयार करण्याचे प्रयत्न गेल्या काही महिन्यात सुरू झाले आहेत, पण त्याला यश येण्याची दूरदूरपर्यंत कोणतीच शक्यता नाही. देशातील जनता काँग्रेसच्या घराणेशाहीला आणि भ्रष्टाचाराला कंटाळली होती. मोदींच्या नेतृत्वात भाजपाने यातून देशाची सुटका केली. ‘न खाऊंगा न खाने दूंगा’ या धोरणाने मोदींनी काँग्रेसचाच नाही तर देशातील सर्व पातळ्यांवरील भ्रष्टाचार हटवला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाला जशास तशी टक्कर मोदी यांनी गेल्या काही वर्षांत दिली. त्यामुळे काँग्रेस रसातळाला गेली आहे. आता देशातील फक्त दोन-तीन राज्यात काँग्रेसची सत्ता उरली आहे. मोदींचा झंझावात असाच सुरू राहिला तर काही वर्षांत देश काँग्रेसमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या बाबतीत अतिआत्मविश्वास बाळगू नये, असे आवाहन मोदी यांनीभाजपाच्या स्थापना दिन कार्यक्रमात केले. ते अतिशय योग्य आहे. निवडणूक जिंकण्यासाठी आत्मविश्वास आवश्यक असतो; मात्र अतिआत्मविश्वास नको असतो. अतिआत्मविश्वास माणसाला सर्वच बाबतीत अडचणीत आणत असतो. राजकारणातील सर्वांत मोठे तत्त्व म्हणजे तुमच्या शत्रूला कधीच कमजोर समजू नका. भाजपाजवळ अमित शाह आणि नरेंद्र मोदी असे दोन दिग्गज नेते आहेत. निवडणुका कशा लढवायच्या आणि जिंकायच्या यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. त्यामुळे भाजपाचा विजयरथ असाच भरधाव निघणार आहे. तो कोणी रोखू शकणार नाही.