भाजपाची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर; महाराष्ट्रातील या तीन नेत्यांना पुन्हा संधी

नवी दिल्ली : भाजपाने पक्षाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज घोषणा केली. ज्यात १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ८ राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय संघटन सरचिटणीस, सह-संघटन महासचिव, १३ राष्ट्रीय सचिव, राष्ट्रीय कोषाध्यक्ष आणि सह- खजिनदार अशी रचना आहे. या पदाधिकाऱ्यांमध्ये ९ महिलांचा समावेश आहे. भाजपाच्या या राष्ट्रीय कार्यकारणीत महाराष्ट्रातील तिघांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. कार्यकारणीत दोन मुस्लीम नेत्यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय कार्यकारणीत महाराष्ट्रातून राष्ट्रीय महामंत्री म्हणून विनोद तावडे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. तर राष्ट्रीय सचिव म्हणून महाराष्ट्रातून विजया रहाटकर, पंकजा मुंडे यांचाही कार्यकारणीत समावेश करण्यात आला आहे. यामुळे यंदाही केंद्रीय कार्यकारणीत महाराष्ट्राचे महत्व अधोरेखीत झाले आहे. पक्षाचे सरचिटणीस आणि केंद्रीय कार्यालयाचे प्रभारी अरुण सिंह यांनी आज सकाळी ही यादी जाहीर केली आहे.

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार रमण सिंह, खासदार सरोज पांडे आणि लता उसेंडी, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार वसुंधरा राजे, झारखंडचे रघुवर दास, मध्य प्रदेशचे सौदान सिंह, उत्तर प्रदेशचे खासदार लक्ष्मीकांत बाजपेयी, खासदार रेखा वर्मा आणि विधान परिषद सदस्य सदस्य तारिक मन्सूर, ओडिशाचे बैजयंत पांडा, तेलंगणाचे डीके अरुणा, नागालँडचे एम चौबा एओ आणि केरळचे अब्दुल्ला कुट्टी, प्रोफेसर तारिक मन्सूर, ज्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले होते, ते AMU चे कुलगुरू राहिले आहेत. अब्दुला कुट्टी, तारिक मन्सूर हे २ मुस्लीम चेहरे भाजपाने कार्यकारणीत पुढे आणले आहेत.

भाजपाच्या या राष्ट्रीय कार्यकारणीतून दोन नेत्यांना राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे. कर्नाटकातील पराभवामुळे सीटी रवी यांची सरचिटणीस पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याचबरोबर आसाममधील भाजपा खासदार दिलीप सैकिया यांनाही सरचिटणीस पदावरून दूर केले आहे. यासोबतच हरीश द्विवेदी यांची राष्ट्रीय सचिव पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. उपाध्यक्ष दिलीप घोष आणि भारतीबेन श्याल यांचा नव्या कार्यकारणीत समावेश करण्यात आलेला नाही.