अहमदाबाद : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: विशेष लक्ष दिल्याने मोदींचीही प्रतिष्ठा गुजरातमध्ये पणाला लागली आहे.आता पर्यंत समोर आलेल्या निकालांनुसार भाजपा १४२ जागांवर आघाडीवर असून ऐतिहासिक विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. यानंतर भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात आहे. काँग्रेस २० तर आप सात जागांवर आघाडीवर आहे. हिमाचल प्रदेशमध्ये अगदी सुरुवातीच्या क्षणापासून याठिकाणी भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. आतापर्यंत समोर आलेले कल पाहता हिमाचल प्रदेशात भाजप ३४ आणि काँग्रेस ३१ जागांवर आघाडीवर आहे. तर आम आदमी पक्षाचा एकही उमेदवार आघाडीवर नाही.
देशभराचे लक्ष लागलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. गुजरातमध्ये २७ वर्षांपासून भाजपची सत्ता असून यंदा भाजप जिंकणार की आप अन् काँग्रेसचा करिश्मा पाहायला मिळणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. गुजरातमध्ये १ डिसेंबर आणि ५ डिसेंबर असं दोन टप्प्यात मतदान पार पडलं. गुजरातमध्ये भाजपाची सत्ता असून, सलग सातव्यांदा सत्ता मिळवण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे आम आदमी पक्षही राज्याच्या राजकारणार प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे. दरम्यान, काँग्रेसच्या कामगिरीकडेही सर्वांचं लक्ष आहे. भाजपा आपला २००२ मधील १२७ जागांचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या कलांनुसार, भाजपा १५० चा आकडा ओलांडण्याची शक्यता आहे. भाजपा कार्यकर्त्यांकडून सेलिब्रेशनला सुरुवात केली आहे.
भाजपाचे सूरत पश्चिममधील उमेदवार पूर्णेश मोदी यांनी भाजपा यावेळी सर्व रेकॉर्ड मोडेल असा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपा यावेळी सर्व रेकॉर्ड मोडेल. आम्हाला यावेळी सर्वात जास्त जागा आणि सर्वाधिक मतदानाची टक्केवारी असेल. मोठ्या फरकाने आमचे उमेदवार विजयी होतील, असं ते म्हणाले आहेत. गुजरातचा निकाल अपेक्षित असून आम आदमी पक्ष आणि भाजपाचं साटंलोटं असल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आपने दिल्ली घेतली आणि गुजरात भाजपासाठी सोडलं असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
हिमाचलमध्ये पुन्हा त्रिशंकू परिस्थिती?
हिमाचल प्रदेशामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. आतापर्यंत समोर आलेले कल पाहता हिमाचल प्रदेशात भाजप ३४ आणि काँग्रेस ३१ जागांवर आघाडीवर आहे. तर आम आदमी पक्षाचा एकही उमेदवार आघाडीवर नाही. तर अन्य पक्षाचे उमेदवार तीन जागांवर आघाडीवर आहेत. याठिकाणी पुन्हा त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांनी पाठिंबा मिळवण्यासाठी आधीपासूनच हालचाली सुरु केल्या होत्या. निवडून येण्याची चिन्हे असलेल्या अपक्ष उमेदवारांशी दोन्ही पक्षांकडून संपर्क साधला जात आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी पक्षाला किमान ३५ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. सध्याची परिस्थिती पाहता याठिकाणी काँग्रेस आणि भाजपला ३३ अशा समसमान जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तास्थापनेत अपक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने आता हिमाचल प्रदेशात आता सत्तास्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी भाजपचे महासचिव विनोद तावडे यांना शिमला येथे पाठवण्यात आले आहे.