नवी दिल्ली : निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षानं (BJP) आज काही महत्त्वाचे बदल केले आहेत. भाजपनं चार राज्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत.
कोणत्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष बदलले?
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सम्राट चौधरी यांना बिहार भाजपचं अध्यक्ष केलंय. तर, सीपी जोशी यांना राजस्थानचं प्रदेशाध्यक्ष बनवलंय. मनमोहन सामल यांची ओडिशासाठी तर वीरेंद्र सचदेवा यांची दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
बिहार भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष आता सम्राट चौधरी असणार आहेत. हायकमांडनं त्यांना बिहार भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष बनवलं आहे. सम्राट चौधरी हे सध्या विधानपरिषदेत विरोधी पक्षनेतेपदावर आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांच्यानंतर आता पक्षाची कमान सम्राट चौधरी यांच्याकडं सोपवण्यात आली आहे.
दिल्लीतील भाजपची कमान वीरेंद्र सचदेवा यांच्याकडं सोपवण्यात आली आहे. दिल्ली भाजपाचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांच्या राजीनाम्यानंतर प्रदेश उपाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांना कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. वीरेंद्र सचदेवा यांचा राजकीय प्रवास संघर्षमय राहिला आहे. ते मंडलातून जिल्हाध्यक्ष आणि आता कार्याध्यक्षपदापर्यंत पोहोचले आहेत. सचदेवा यांची संघटनात्मक पकड खूप मजबूत आहे.
राजस्थानमध्ये भाजपनं राज्य प्रमुख सतीश पुनिया यांच्या जागी चित्तोडगडचे लोकसभा खासदार सीपी जोशी यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलीये. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी सीपी जोशी यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा आदेश जारी केला आहे. सीपी जोशी हे भारतीय राजकारणी, शेतकरी आणि भारतीय जनता पार्टी या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. सीपी जोशी यांचं पूर्ण नाव चंद्रप्रकाश जोशी आहे, मात्र परिसरात ते सीपी जोशी या नावानं लोकप्रिय आहेत. सध्या ते चित्तोडगड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आहेत.
राज्याचे माजी महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मनमोहन सामल यांची पक्षानं ओरिशाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती तत्काळ प्रभावानं लागू करण्यात येणार आहे. पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता भाजपनं ओडिशाची कमान महमोहन सामल यांच्याकडं सोपवली आहे. निवडणुकीची सर्व तयारी पक्षानं सुरू केली आहे.