परळी : भाजप आमदार सुरेश धस यांच्या परळी दौऱ्यादरम्यान त्यांना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. परळीच्या बदनामीचा आरोप करत, आंदोलकांनी त्यांच्याविरोधात तीव्र आंदोलन केले. शिरसाळा गावात सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवण्यात आले, तसेच जोरदार घोषणाबाजी करून त्यांचा निषेध करण्यात आला. या आंदोलनानंतर आता आमदार सुरेश धस यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना सुरेश धस म्हणाले, “लोकशाही मार्गाने काळे झेंडे दाखवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, तो त्यांनी वापरावा. मात्र पोलिसांसमोर दगड उचलण्याची मजल या लोकांची जाते. माजी पालकमंत्री असलेल्या नेत्याच्या आणि दुसऱ्या मंत्री असलेल्या नेत्याच्या भागातील लोक कसे वागतात, हे सर्वांना दिसत आहे.” असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला.
हेही वाचा : ब्रेकअप केलं म्हणून प्रियकराचं संतापजनक कृत्य, खोटं कारण देत बोलावलं रात्री अन्…
पुढे बोलताना ते म्हणाले, “मी पाच वेळा आमदार राहिलो आहे, एकदा राज्यमंत्रीपदही भूषवले आहे. तरीही माझ्या गाडीसमोर काहीजण पोरकट लक्षणं करतात. हे दगड घेऊन मला मारणार होते का? त्यांनी दगड उचलले, पण ते माझ्यावर मारणार नव्हते, तर फक्त आपण काहीतरी करत असल्याचं दाखवण्याचा हा प्रकार आहे. मात्र ही गुंडगिरी आणि दहशत संपवण्यासाठीच मी राजकारणात आलो आहे.”
शिरसाळ्यात मार्केट कमिटीने गायरान जमिनीवर गाळे काढले. रस्त्यावर उतरून निषेध करणारे हेच गाळेधारक असावेत किंवा बेकायदेशीर वीटभट्टीवाले असावेत, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे या आंदोलनामागे कोणाचा हात आहे, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. त्यातच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील सातत्याने सुरेश धस यांच्यावर टीका करत आहेत. मात्र या टीकेला उत्तर देताना सुरेश धस म्हणाले, “मनोज जरांगे पाटील हे आमचे दैवत आहेत, त्यामुळे मी त्यांच्यावर काहीही बोलणार नाही.”