गौप्यस्फोट : कारगिल युद्धाला विरोध केल्याने माझी हकालपट्टी केली होती’

लाहोरः कारगिल युद्धाला विरोध केल्याने दिवंगत जनरल परवेझ मुशर्रफ यांनी १९९९ मध्ये सरकारमधून माझी हकालपट्टी केली होती, असा गौप्यस्फोट पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाज (पीएमएल-एन) या पक्षाचे प्रमुख नवाझ शरीफ यांनी शनिवारी केला.

भारत आणि इतर शेजारी देशांबरोबर दृढ संबंध प्रस्थापित करण्याचे महत्त्व मी त्यावेळी अधोरेखित केले होते, असेही शरीफ यांनी सांगितले. पाकिस्तानमध्ये पुढील वर्षी फेब्रुवारीत सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.

‘पीएमएल-एन’ पक्षाकडून तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांशी संवाद साधताना ते बोलत होते. ‘‘तीनवेळा पंतप्रधान झालो असताना या पदावरून मुदतीपूर्वीच माझी हकालपट्टी का केली, असा सवाल त्यांनी केला. ‘‘१९९३ आणि १९९९ मध्ये मला का हटविण्यात आले, हे लोकांना कळाले पाहिजे. असे करू नये, असे सांगत मी कारगिल मोहिमेला विरोध केला होता. त्यामुळे तत्कालीन जनरल परवेझ मुशर्रफ यांनी माझी हकालपट्टी करून मोहीम प्रत्यक्षात आणली. विरोध करताना मी जे सांगितले होते, ते नंतर खरे ठरले. मी तीनवेळा पंतप्रधान होतो; पण प्रत्येकवेळी मला पदावरून का हटविण्यात आले, हे मला कळायला हवे.’’

शरीफ यांनी भाषणात भारताचाही उल्लेख केला. ते म्हणाले, की भारत आणि इतर शेजारी देशांशी चांगले संबंध असणे आवश्‍यक आहे. प्रत्येक आघाडीवर आपल्याला काम करायला हवे. मी पंतप्रधान असताना भारताच्या दोन पंतप्रधानांनी पाकिस्तानला भेट दिली होती. वाजपेयी साहेब आणि मोदी साहेब लाहोरला आले होते.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला

आर्थिक वाढीच्या विकासात पाकिस्तान शेजारील देशांच्या मागे गेल्याबद्दल शरीफ यांनी खेद व्यक्त केला. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, ‘‘नवख्या व्यक्तीकडे देशाची धुरा कशी सोपविली, हे समजत नाही. इम्रान खान यांच्या सत्ताकाळात (२०१८-२०२२) देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली होती. एप्रिल २०२२ मध्ये शहबाझ शरीफ यांचे सरकार सत्तेवर आले आणि त्यांनी देशाला कर्जबाजारी होण्यापासून वाचविले. आपल्याला भारत, अफगाणिस्तान आणि इराणसोबतचे संबंध सुधारावे लागतील. चीनशी संबंध अधिक दृढ करायला हवेत, असंही नवाझ शरीफ म्हणाले.