प्रासंगिक
– राहुल गोखले
बदनामी खटल्यात दोन वर्षांची शिक्षा न्यायालयाने सुनावल्यानंतर काँग्रेस नेते Rahul Gandhi राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली. वास्तविक न्यायालयाच्या या निर्णयाला वरच्या न्यायालयात आव्हान देणे हा कायदेशीर मार्ग झाला. ते करायचे नसेल तर आपल्या खासदारकीच्या ‘हौतात्म्या’च्या आत्मसंतुष्टतेत वावरण्याचा हक्क राहुल यांना आहे. तथापि, या सर्व नाट्यावर मल्लिनाथी करताना राहुल यांनी नेहमीप्रमाणेच औचित्यभंग केला आहे. ‘आपण माफी मागणार नाही’ एवढे बोलून न थांबता ‘आपण सावरकर नाही’ असे सांगून अप्रत्यक्षपणे ‘सावरकर हे माफीवीर होते’ हा आपला जुनाच राग पुन्हा एकदा आळवला आहे. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आलेली असताना राहुल यांनी हाच विषय पत्रकार परिषदेत छेडला होता आणि विरोधाचा आग्यामोहोळ उठवून दिला होता. त्यानंतर झालेल्या सभेत या विषयावर चकार शब्दही काढणे राहुल यांनी टाळले होते. आता पुन्हा तोच विषय त्यांनी उकरून काढला आहे आणि पुन्हा एकदा देशभर आणि विशेषत: महाराष्ट्रात राहुल गांधी हे टीकेचे लक्ष्य होत आहेत. सावरकर आणि काँग्रेस हा वैचारिक विरोध कायमच राहणार. मात्र, त्या विरोधाचा स्तरदेखील त्याच प्रतीचा असायला हवा. केवळ सावरकर हे माफीवीर होते एवढेच पालुपद रेटण्याचा अगोचरपणा राहुल वारंवार करीत आहेत. त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविकच आहे.
महाविकास आघाडीत असूनही उद्धव ठाकरे यांनी मालेगावमधील आपल्या सभेत राहुल यांना या विषयावरून खडसावले. हिंदुत्व हा आपला प्राण आहे असे म्हणायचे तर सावरकरांवरील अश्लाघ्य टीकेचा समाचार घ्यावाच लागणार, हे अपरिहार्य ठरते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारतर्फे प्रत्येक जिल्ह्यात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. ती योग्य वेळी केलेली स्वागतार्ह घोषणा आहे, असेच म्हटले पाहिजे. शिंदे यांच्या शिवसेना मंत्र्यांनी आपापल्या ट्विटर खात्यांचे ‘डीपी’ देखील बदलले आहेत आणि सावरकरांची प्रतिमा ‘डीपी’ म्हणून ठेवली आहे. हे सर्व प्रतीकात्मक असले तरी त्याचा संदेश प्रतीकात्मकतेच्या पलीकडे जाणारा आहे; आणि तो म्हणजे सावरकरांचा अवमान सहन केला जाणार नाही हा!
सावरकर यांच्यासारख्या धगधगत्या अग्निकुंडाला शहाजोगपणे हात घालणे म्हणजे आपले हात पोळून घेण्यास आमंत्रण. स्वातंत्र्यासाठी आपल्या आयुष्याचा होम करणारे सावरकर बंधू हे इतिहासातील दुर्मिळ उदाहरण. अर्थात स्वातंत्र्यानंतरदेखील सावरकरांना तत्कालीन काँग्रेस सरकारने वेगवेगळ्या कारणांनी तुरुंगवास घडविला. त्यातील एक अटक ही तर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान यांच्यादरम्यान दिल्लीत होणार्या वाटाघाटींच्या पृष्ठभूमीवर होती! पाकिस्तानशी होणार्या वाटाघाटींसाठी आपल्याच देशातील राष्ट्रभक्तांना अटकेत ठेवणे हा अजब न्याय होता.
सावरकरांच्या तेजस्वी जीवनातील अनेक घटना-प्रसंग यांचे आकलन करून घेतले तर आताही ते Rahul Gandhi राहुल गांधी आणि तत्सम मंडळींच्या डोळ्यांत अंजन घालतील. वैभव पुरंदरे यांनी लिहिलेल्या सावरकरांच्या चरित्रात म्हटले आहे- ब्रिटनला गेल्यानंतर (1906) सहा महिन्यांतच सावरकरांनी इटालियन क्रांतिकारक मॅझिनीच्या चरित्राचा मराठी अनुवाद पूर्ण केला आणि 1908 मध्ये सावरकरांनी ‘1857 चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ सिद्ध केला. त्या ग्रंथाने सावरकरांची संशोधन वृत्ती सिद्ध केलीच; पण क्रांतिकार्याविषयी ओढदेखील अधोरेखित केली. त्या ग्रंथाचे स्वागत क्रांतिकार्याकडे कल असणार्यांनी केलेच; मात्र त्यावेळी ब्रिटनच्या ट्रिनिटी कॉलेजात शिक्षण घेत असलेल्या जवाहरलाल नेहरूंनीदेखील केले. (वडील मोतीलाल नेहरू यांनी जवाहरलाल यांना कोणत्याही राजकीय कार्यक्रमापासून दूर राहण्याची ताकीद दिली होती आणि त्यामुळे जवाहरलाल यांनी इंडिया हाऊसमध्ये कधी पाऊलही ठेवले नव्हते.) सावरकरांनी सिद्ध केलेला हा ग्रंथ म्हणजे एक अतिशय प्रभावी काम असल्याचे मत व्यक्त केले होते- अर्थात काही ठिकाणी लेखनात शब्दजंजाळपणा आला आहे आणि काही ठिकाणी समतोल ढळला आहे, असेही मत व्यक्त केले. पुढे नेहरू भारतात परतले आणि स्वातंत्र्य लढ्यात उतरले. तेव्हा त्यांनी लिहिले की, सावरकरांच्या त्या ग्रंथाची जर संक्षिप्त आणि अलंकारिकता वगळून नवीन आवृत्ती काढली तर 1857 च्या लढ्याचे ब्रिटिशांनी जे चित्र तयार केले होते त्याचा उत्तम प्रतिवाद करू शकेल. अर्थात तेच नेहरू पुढे मात्र सावरकरांविषयी आकसाने वागले, हेही नाकारता येत नाही.
काँग्रेसचा क्रांतिकारकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती संकुचित होता, हेही इतिहासात डोकावून तपासून घेतले पाहिजे. आपल्या सुटकेसाठी सावरकर प्रयत्नशील होते हे खरे आणि त्यात वावगे काही होते असे समजण्याचे कारण नाही. अंदमानातून बंद्यांच्या मुक्ततेची मागणी करणारे सूर देशात वाढत आहेत याविषयी सावरकरांना समाधान होते; पण त्याच वेळी काँग्रेसची भूमिका मात्र संदिग्ध होती याविषयी ते नाराजही होते. बंद्यांविषयी सहानभूती प्रतीत होईल असा कोणताही शब्द काँग्रेस उच्चारत नाही हे अचंबित करणारे आहे, असे सावरकरांनी नारायणराव सावरकरांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. धनंजय कीर यांनी लिहिलेल्या सावरकर चरित्रातील आणखी एक प्रसंग येथे नमूद करावयास हवा. कीर लिहितात- ‘‘सावरकरांचे बंधू बाबाराव सावरकर 1945 साली निधन पावले. बाबारावांचे देहावसान झाल्यानंतर गांधीजींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना दुखवट्याचे पत्र पाठवले. पण त्यातील विचित्रपणा असा की, ते पत्र पाठवले मात्र रत्नागिरीच्या पत्त्यावर. सावरकरांनी रत्नागिरी सोडून आठ वर्षे लोटली होती, हे गांधीजींच्या गावीही नव्हते, असे म्हणायचे काय? हैदराबादच्या निझामाची आई वारली तेव्हा गांधीजींनी अचूक पत्त्यावर तत्काळ दुखवट्याची तार निझामाला पाठवली होती. सावरकरांना मात्र तार न करता साधे पत्र लिहिले तेही चुकीच्या पत्त्यावर धाडले! गांधीजींच्या तीक्ष्ण मनाचे असे स्मृती-खलन होणे शक्य आहे काय? अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी नि जपान येथील पुढार्यांना, मुत्सद्यांना नि वृत्तपत्रांना सावरकरांचा मुंबईचा पत्ता अचूक माहीत होता. तर तो गांधीजींना माहीत नव्हता असे म्हणता येणार नाही.’’ यावर राहुल यांच्याकडे काही स्पष्टीकरण असेल काय?
Rahul Gandhi राहुल यांच्याच पठडीतील शंकासुर तेव्हाही होतेच! कानपूरस्थित वृत्तपत्र असणार्या प्रतापचे संपादक गणेश शंकर विद्यार्थी यांनी ‘श्रद्धानंद’ या मराठी साप्ताहिकाकडे 1928 मध्ये पत्र पाठविले: जे लोक स्वत:ला हुतात्मे म्हणून मिरवू पाहत होते अशांनी मुळातच क्षमायाचना का करावी? त्यांनी कारावासात मृत्यूला का कवटाळले नाही? सरकारकडे याचना करण्याचे काय कारण होते? सावरकरांनी त्वरित विद्यार्थी यांच्या टीकेला उत्तर दिले जे त्या साप्ताहिकाने प्रसिद्ध केले : पंजाबपासून पाँडिचेरीपर्यंत आणि सिंधपासून बंगालपर्यंत कित्येक क्रांतिकारकांनी आपल्या घरांचा होम केला तो देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून; त्यांनी स्वतःला अशा लढ्यात झोकून दिले जो मृत्यूचा सापळाच होता. ते जेव्हा समरभूमीवर जखमी अवस्थेत कोसळले आणि अनेक वर्षे यातना भोगल्या तेव्हा त्यांनी शत्रूच्या शर्ती मान्य करण्याचे ठरविले- ती एक तात्पुरती माघार होती तीही यासाठी की नव्याने पुन्हा मातृभूमीच्या मुक्ती लढ्यात नव्याने उतरता यावे. सरकारकडे सुटकेची याचना केली त्याऐवजी फाशी का पसंत केली नाही, असा प्रश्न विचारण्याचे औद्धत्य एखादा हीन वृत्तीचा माणूसच दाखवू शकतो. सावरकरांनी पुढे विद्यार्थी यांच्यावर हल्ला चढवित लिहिले : कलकत्त्याच्या ‘स्वतंत्र’ या दैनिकाच्या अंकात आपण असे वाचले होते की, एका स्थानिक न्यायालयाने कोर्टाच्या अवमानाची नोटीस ‘प्रताप’ वृत्तपत्राला पाठविली होती तेव्हा संपादक असणारे विद्यार्थी यांनी त्या खटल्यातून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी बिनशर्त माफी मागितली होती. वास्तविक विद्यार्थी यांच्या आयुष्याला काहीही धोका नव्हता; पण एखाददोन वर्षांच्या संभाव्य तुरुंगवासाची शक्यतादेखील विद्यार्थी यांना सहन झाली नाही. आपण संपादकांची चेष्टा करीत नाही असे सावरकरांनी स्पष्ट केले. प्राप्त परिस्थितीत ती माफी सयुक्तिकही असेल; पण त्याचमुळे क्रांतिकारकांच्या क्षमायाचनेवर विद्यार्थी यांची टीका ही पूर्वग्रहदूषित होती, असे सावरकरांनी लिहिले.
सावरकरांवर अश्लाघ्य टीका करून राजकीय स्वार्थ साधता येईल, अशी Rahul Gandhi राहुल गांधी यांची अपेक्षा असेल तर त्यांनी मणिशंकर अय्यर यांनी अंदमानात सावरकरांच्या नावाचा आणि पंक्तींचा उल्लेख असणारा फलक काढण्याचे आदेश 2004 साली पेट्रोलियम मंत्री म्हणून दिले होते; या घटनेची उजळणी करावी. त्यानंतर संसदेत झालेल्या गदारोळात अय्यर यांनी माफी मागण्यास नकार दिला होता. त्यानंतर 10 वर्षांतच काँग्रेसची स्थिती दारुण झाली. वैचारिक विरोध कधीही आक्षेपार्ह नसतो; मात्र अय्यर काय किंवा राहुल गांधी काय; सावरकरांसारख्या जाज्वल्य देशभक्ताचा हीन स्तरावर जाऊन ते अवमान करतात आणि वर आपण माफी मागत नाही, अशा राणाभीमदेवी आविर्भावात वावरतात. मग मतदारदेखील त्यांना क्षमा करीत नाहीत हा पूर्वानुभव आहे.
– 9822828819