राहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ भुसावळात युवक काँग्रेसचे रास्ता रोको

भुसावळ : संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व उद्योगपती अडाणी यांच्यामध्ये नेमके कुठले संबंध आहेत? याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विचारणा केल्यानंतर देशात मोदी सरकारने दडपशाहीचा वापर करीत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली व या कारवाईच्या निषेधार्थ युवक काँग्रेसतर्फे शुक्रवारी दुपारी 12.30 यावल रस्त्यावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्‍यांनी रास्ता रोको केला. याप्रसंगी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनामुळे काही वेळ यावल-जळगावकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. शहर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले व काही वेळेनंतर त्यांची सुटका करण्यात आली.

प्रत्येक युवक बनेल राहुल गांधींचा आवाज
राहुल गांधी यांनी संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व उद्योगपती अडाणी यांच्यामध्ये नेमके कुठले संबंध आहेत..? तसेच उद्योगपती अदानी यांच्या कंपनीमध्ये आलेले 20 हजार कोटी रुपये नेमके कुणाचे..? यासंबंधीचे प्रश्न उपस्थित करीत मोदी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यापूर्वीच मोदी सरकारने दडपशाही करत एका खोट्या गुन्ह्याखाली राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावत त्यांची खासदारकी रद्द केली मात्र या प्रकारानंतर देशातील युवक आता स्वस्थ बसणार नाही तर देशातील व जिल्ह्यातील प्रत्येक युवक काँग्रेसचा पदाधिकारी हा राहुल गांधी यांचा आवाज बनत चौका-चौकात व रस्त्यांवर आंदोलन करीत मोदी सरकारला नेहमी अदानी आणि मोदी यांच्या संबंधांबद्दल प्रश्न विचारात राहणार असल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे म्हणाले.

यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनात जळगाव जिल्हा युवक काँग्रेस तसेच जळगाव जिल्हा एनएसयुआयच्या पदाधिकार्‍यांसह महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत भैय्या ओगले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष योगेंद्र पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी आनंद पुरोहित, प्रदेश सरचिटणीस इम्रान खान, एनएसयुआय प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, जळगाव शहराध्यक्ष मुजीब पटेल, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष भूपेंद्र जाधव, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष मुन्वर खान, भुसावळ युवक काँग्रेस अध्यक्ष तौफिक शेख, अमळनेर युवक काँग्रेस अध्यक्ष महेश दगडु पाटील आदींची उपस्थिती होती. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक विनोद गोसावी व सहकार्‍यांनी आंदोलकांना ताब्यात घेत नंतर त्यांची सुटका केली.