---Advertisement---
नंदुरबार : सातपुड्यातील नर्मदा खोऱ्यातील गावांना तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी वर्षभरापूर्वी सीएसआर फंडातील दीड कोटी रुपयांचा निधी खर्च करून खरेदी केलेली बोट अॅम्ब्युलन्सला जलसमाधी मिळाली आहे. रविवारी (दि. ३ ऑगस्ट) सकाळी मणिबेली, ता. अक्कलकुवा याठिकाणी ही बोट बुडाल्याचे दिसून आले होते. नर्मदेच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाल्याने ही बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे.
सातपुड्याच्या अती दुर्गम भागातील नर्मदा खोऱ्यात मणिबेली, चिमलखेडी, धनखेडी, गमन, सिंदुरी, डनेल, बामणी, मुखडी, अरेठी, ता. अक्कलकुवा आणि गेंदा, भूषा, सावऱ्या दिगर, माळ, ता. धडगाव या गावांमधील अत्यवस्थ रुग्णांसह गंभीर रुग्णांना तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाच्या सीएसआर बोट अॅम्ब्युलन्स खरेदी करण्यात आली होती. तत्पर सेवेसाठी सरदार सरोवर प्रकल्पाच्या जलाशयात ही बोट तैनात होती.
गेल्या काही दिवसांपासून नर्मदा नदीला वेळोवेळी पूर येत असल्याने महाकाय सरदार सरोवर प्रकल्पाचे दरवाजे स्वयंचलित पद्धतीने उघडले आणि बंद होत आहेत. शनिवारी प्रकल्पात पाणी आल्यानंतर दरवाजे उघडून पाणी वाहून गेले होते.
यामुळे पाण्याची पातळी खाली गेल्याने मणिबेली पॉइंटवर उभी असलेली बोट एका बाजूने कलंडली होती. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने बोट बुडाल्याचे समोर आले आहे. चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असे डीएचओ सोनवणे यांनी सांगितले .