धुळे : तालुक्यातील आंबोडे गावात अंदाजे २५ वर्ष वयोगटातील अनोळखी तरुणाचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासानंतर घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला असून, तालुका पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
मृतदेह आढळल्याची माहिती बुधवारी (दि. २९) सायंकाळी साडेसातच्या सुमारास नियंत्रण कक्षाला मिळाली. तत्काळ तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तपासासाठी एलसीबी, श्वान पथक आणि ठसेतज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले.
हेही वाचा : धक्कादायक! मुलांनीच संपवलं आईच्या बॉयफ्रेंडला, रस्त्यावरच केला थरारक हल्ला
श्वान पथकाने काही अंतरापर्यंत मार्ग दाखवला, मात्र त्यानंतर ते घटनास्थळीच घुटमळत राहिले. ठसेतज्ञ पथकाने महत्त्वाचे नमुने गोळा केले असून, त्याचा पुढील तपास सुरू आहे. मृतदेह संपूर्ण काळा पडलेला असल्याने ओळख पटवणे कठीण झाले आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतदेह सडल्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली होती. पोलिसांकडून मयत तरुणाच्या ओळखीचा शोध सुरू असून, नागरिकांना कुठलीही माहिती मिळाल्यास पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. तो नैसर्गिक मृत्यू आहे की घातपात, यावरून पुढील तपासाची दिशा ठरेल.
पोलीस तपास सुरू
पोलिसांनी या अनोळखी मृत तरुणाची ओळख पटवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली असून, मृत्यूमागील गूढ उलगडण्यासाठी पोलिसांची शोधमोहीम वेगाने सुरू आहे.