---Advertisement---
जळगाव : गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १९ वर्षीय तरुणाचा शुक्रवारी विहिरीत मृतदेह आढळून आला. यावल तालुक्यातील मोहराळा येथे ही घटना घालडी. साहिल शब्बीर तडवी (वय १९) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून, याबाबत एका कुटुंबातील काही जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
---Advertisement---
मोहराळा गावातील साहिल शब्बीर तडवी (वय १९) हा १६ जूनपासून बेपत्ता झाला होता. त्याचा शोध घेण्यात आला मात्र, तो कुठेच मिळून आला नाही. यामुळे यावल पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदवली होती. दरम्यान, या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी मोहराळा गावापासून वड्रीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शेत विहिरीत मिळून आला.
तरुणाच्या मृतदेहाची माहिती मोहराळा गावात मिळताच जमावाने गावातील एका कुटुंबावर घातपाताचा संशय व्यक्त करीत त्यांच्या घराबाहेरील चारचाकी वाहनाची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, हवालदार वासुदेव मराठे, हवालदार सुनील पाटील, अमित तडवी हे घटनास्थळी दाखल झाले. याबाबत पोलिसांनी चौकशीसाठी गावातील काही जणांना ताब्यात घेतले आहे.
इन कॅमेरा शवविच्छेदन करा
रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. कुटुंबियांनी इन कॅमेरा शवविच्छेदनाची मागणी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणला तर, गावात हवालदार नीलेश चौधरी, मोहन तायडे, अल्लाउद्दीन तडवी, भरत कोळी, सागर कोळी यांसह कर्मचारी तैनात केले आहे.