---Advertisement---
जळगाव : बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने साथी पोर्टलच्या माध्यमातून विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी राज्यात करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत अमळनेर येथे राज्यातील पहिले तालुकास्तरीय बियाणे विक्रेत्यांचे प्रशिक्षण झाले. प्रशिक्षणात साथी पोर्टलचे उद्दिष्ट, कार्यपद्धती व त्याचे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
अमळनेर तालुका बियाणे विक्री संघटना व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर बाजार समितीच्या सभागृहात हा प्रशिक्षण वर्ग झाला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोक पाटील यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रशिक्षणास जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे, जि. प.चे मोहीम अधिकारी अविनाश खैरनार, महाबीज अधिकारी संजय देवरे, तालुका कृषी अधिकारी सी. जे. ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.
माफदा संघटनेचे योगेश पवार, प्रदीप पारेख आदी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (एनआयसी) च्या सहकार्याने विकसित केलेल्या साथी पोर्टल फेज-२ मुळे शेतकऱ्यांची फसवणुकीस आळा बसून बियाणे साथी प्रणालीतील सर्व बाबी या ऑनलाइन असल्यामुळे शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे मिळण्यास मदत होणार आहे. या प्रणालीद्वारे बियाण्याचा प्रवास समजणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास वाढून पारदर्शकता निर्माण होईल, असे विकास बोरसे यांनी सांगितले.
असे आहे साथी पोर्टल
साथी पोर्टल माध्यमातून अनेक बियाणे पिढ्यांमध्ये संपूर्ण बियाणे जीवनचक्र समाविष्ट करण्यासाठी एक समग्र दृष्टिकोन प्रदान करण्यात येणार आहे. म्हणजेच बियाणे उत्पादन स्थळापासून ते अंतिम ग्राहक शेतकरी यांच्या पर्यंतचा संपूर्ण प्रवास याद्वारे नियंत्रित केला जाणार आहे. या प्रणालीत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बियाणेचा उत्पादन स्थळ, बियाणे उत्पादक, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेता आणि शेवटी शेतकरी अशा विविध पातळीवरील बियाणाचा प्रवास हा ऑनलाईन पद्धतीने होणार असून, या सर्व पातळ्यांवर शासनाकडे अद्यावत माहिती उपलब्ध होणार आहे.