---Advertisement---

FD Interest Rate : ‘या’ बँकेने एफडीवरील व्याजदर केले कमी, चारशे दिवसांची ‘ही’ योजनाही केली बंद

---Advertisement---

FD Interest Rate : बँक ऑफ इंडिया (बीओआय) ने मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात बदल केले आहेत. तसेच बँकेने त्यांची ४०० दिवसांची विशेष एफडी योजनाही बंद केली असून, हे सर्व बदल आज (१५ एप्रिल) पासून लागू झाले आहेत.

एफडीवरील व्याजदरही कमी

बँकने त्यांच्या काही एफडीवरील व्याजदरही कमी केले आहेत. बँक ऑफ इंडियाने सुरू केलेल्या विशेष ४०० दिवसांच्या योजनेत ७.३०% चा चांगला व्याजदर मिळत होता. आता ही योजना बंद करण्यात आली आहे. बँकेने अनेक एफडी योजनांवरील व्याजदर कमी केले आहेत. आता, ९१ ते १७९ दिवसांच्या एफडीवर ४.२५% व्याज मिळेल. पूर्वी यावर ४.५०% व्याज होते. १८० दिवस ते १ वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदर ५.७५% पर्यंत कमी करण्यात आला आहे, जो पूर्वी ६.००% होता. आता, १ वर्षाच्या एफडीवर ६.८०% व्याज मिळेल, जे पूर्वी ७.००% होते. १ वर्षापेक्षा जास्त आणि २ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ६.७५% व्याज दिले जाईल. पूर्वी यावर ६.८०% व्याज होते.

वृद्धांना होणार अधिक फायदा

ज्येष्ठ नागरिकांना (६० वर्षांवरील) ०.५०% अधिक व्याज मिळेल. अति ज्येष्ठ नागरिक (८० वर्षांवरील) यांना ०.६५% अधिक व्याज मिळेल. हे फायदे ६ महिने किंवा त्याहून अधिक कालावधीच्या एफडीवर उपलब्ध असणार आहेत.

..तर दंड

जर १ वर्षानंतर ५ लाख रुपयांपेक्षा कमी रकमेची एफडी मोडली तर कोणताही दंड आकारला जाणार नाही. जर ही एफडी १ वर्षापूर्वी मोडली तर ०.५०% दंड आकारला जाईल. ५ लाख किंवा त्याहून अधिक रकमेची एफडी मुदतपूर्व बंद केल्यास १% दंड आकारला जाईल. परंतु जर तुम्ही एफडी मोडली आणि ती जास्त काळासाठी पुन्हा जमा केली तर कोणताही दंड आकारला जाणार नाही. तसेच ठेवीदाराचा मृत्यू झाला तरी, एफडी मोडल्याबद्दल कोणताही दंड आकारला जाणार नाही. एकूणच बँक ऑफ इंडियाच्या या बदलांमुळे, एफडी धारकांना त्यांच्या नियोजनाचा पुनर्विचार करावा लागणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment