पुणे, ता. १३ : बावधनजवळील सुस रोड येथील एका नामांकित खासगी शाळेत बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल आल्याने गुरुवारी (ता. १३) सकाळी खळबळ उडाली. शाळेच्या मुख्याध्यापिकेला मिळालेल्या या मेलनंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. स्थानिक पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथकांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण शाळेची कसून तपासणी केली. मात्र, तपासणीनंतर कुठेही स्फोटक पदार्थ आढळला नाही, त्यामुळे हा केवळ एक खोडसाळपणा असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
शाळेत बॉम्ब असल्याची सूचना मिळताच पोलिसांनी तातडीने विद्यार्थ्यांना सुरक्षित झोनमध्ये हलवले आणि परिसराची बारकाईने तपासणी सुरू केली. बॉम्ब शोधक व नाशक पथकासह श्वानपथकही घटनास्थळी दाखल झाले होते. काही तासांच्या तपासणीनंतर कुठेही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
हेही वाचा : सुनेच्या प्रियकराला सासूने बोलावलं भेटायला; मग पुढे जे घडलं त्याचा त्याने स्वप्नातही केला नसेल ‘विचार’
पोलिसांकडून तपास सुरू, नागरिकांनी घाबरू नये
या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, संबंधित ई-मेल कोणी आणि कुठून पाठवला याचा शोध घेतला जात आहे. “या प्रकारामुळे घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. आम्ही याचा तपास सुरू केला असून लवकरच सत्य समोर येईल,” असे आश्वासन पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिले.
या घटनेमुळे काही वेळ पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या त्वरित कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे. तरीही असे खोडसाळ प्रकार घडू नयेत, यासाठी पोलिसांकडून कडक उपाययोजना करण्यात येत आहेत.
डुकरांच्या मृत्यूने खळबळ; पशुसंवर्धन विभागाची पाहणी
पुणे : कोथरूड परिसरात डुकरांच्या मृत्यूच्या घटना समोर येत असून, यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने बुधवारी कोथरूडमध्ये पाहणी केली. मृत डुकराच्या शवविच्छेदनातून कावीळसदृश आजाराचे कारण समोर आले असून, याची अधिकृत पुष्टी करण्यासाठी डुकरांचे काही अवयव भोपाळमधील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. महापालिकेने देखील तातडीने पावले उचलत ७६ डुकरांना पकडून निरीक्षणाखाली ठेवले आहे. दोन दिवसांनंतर त्यांना कत्तलखान्यात पाठविण्यात येणार आहे.
कोथरूडमध्ये अचानक डुकरांचे मृत्यू होऊ लागल्याने स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. याबाबत महापालिकेला विचारणा करण्यात आली असता, सुरुवातीला त्यांच्याकडे ठोस माहिती नव्हती. महापालिकेच्या आरोग्य विभाग व कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयातील समन्वयाअभावी माहिती मिळण्यात उशीर झाला, त्यामुळे त्वरित उपाययोजना करण्यास विलंब झाला.
राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने याची दखल घेत सहाय्यक आयुक्त बाळासाहेब गायकवाड आणि इतर दोन अधिकाऱ्यांचे पथक बुधवारी भारतीनगर परिसरात पाहणीसाठी पाठवले. त्यांना कोथरूड कचरा डेपो येथे मृत डुक्कर आढळला. तातडीने शवविच्छेदन करण्यात आले असता, डुकराच्या मृत्यूमागे कावीळसदृश आजार असल्याचे आढळले. मात्र, या मृत्यूमागील नक्की कारण शोधण्यासाठी आणि अधिकृत निष्कर्ष काढण्यासाठी डुकरांचे काही अवयव भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यासंदर्भात गायकवाड यांनी ‘सकाळ’शी बोलताना माहिती दिली.
या प्रकरणात तक्रारदार दुष्यंत मोहोळ यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागावर समन्वयाच्या अभावाचा आरोप केला आहे. ते म्हणाले, “या प्रकरणाचा पाठपुरावा करत असूनही आरोग्य विभाग व क्षेत्रीय कार्यालय यांच्यात कोणताही समन्वय नाही. त्यामुळे डुकरांच्या मृत्यूचा निश्चित आकडा मिळत नाही. नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊ नये यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही.”
महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले, “महापालिकेच्या यंत्रणेने मृत डुकरांची अधिकृत संख्या ४१ असल्याचे निश्चित केले आहे. कोथरूडमध्ये तातडीने औषध फवारणी केली जात असून, या प्रकरणावर नियंत्रण मिळवण्यासाठी भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे. डुकरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढू नये यासाठी आम्ही आवश्यक त्या उपाययोजना करत आहोत.”
डुकरांच्या मृत्यूमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. नागरिकांना अधिकृत माहिती मिळत नसल्याने अफवा पसरत आहेत. महापालिकेने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. प्रशासनाने वेळीच पावले उचलून योग्य त्या तपासण्या करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.