AUS vs IND । ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात होणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२४-२५ या कसोटी मालिकेसाठी चाहत्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. दोन्ही देशात या मालिकेबद्दल चर्चा होताना दिसत आहेत. त्यामुळे या मालिकेची उत्सुकता शिगेला पोहचल्याचे लक्षात येत आहे.
ही मालिका शुक्रवार, २२ नोव्हेंबर रोजी सुरु होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. मात्र याचदरम्यान, ऑस्ट्रेलियाला जसप्रीत बुमराहची भीती सतावत असल्याचे स्पष्ट होत आहे.
पहिली कसोटी पर्थच्या उसळत्या खेळपट्टीवर होत आहे. यजमान टीम इंडियाची थोडी काळजी नक्कीच असेल पण ऑस्ट्रेलियालाही भीती वाटत असेल हे तितकेच खरे. ऑस्ट्रेलियाच्या मनात बुमराहची भीती आहे. फॉक्स क्रिकेटच्या अहवालात प्रकाशित झालेल्या एका ओळीवरून हे अधिक समजत आहे.
फॉक्स क्रिकेटच्या अहवालातनुसार, 1970 च्या वेस्ट इंडिजच्या वेगवान आक्रमणानंतर बुमराह ऑस्ट्रेलियाचा दौरा करणारा पहिला विदेशी गोलंदाज आहे, ज्याची भीती ऑस्ट्रेलियाच्या मनात दिसत आहे.
ऑस्ट्रेलियाच्या मागील दोन दौऱ्यांमध्ये 30 वर्षीय बुमराहने 21.25 च्या सरासरीने 32 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये 33 धावांत 6 विकेट्स, ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
2018 च्या दौऱ्यात त्याने बॉक्सिंग डे टेस्टमध्ये हा पराक्रम केला होता. 20 व्या शतकाच्या सुरुवातीपासून, ऑस्ट्रेलियामध्ये बुमराहपेक्षा कमी सरासरी आणि जास्त विकेट घेणारे दोनच गोलंदाज आहेत. त्यापैकी एक सर रिचर्ड हॅडली आणि दुसरे सर कर्टली ॲम्ब्रोस.
बुमराहची खासियत म्हणजे, तो प्रत्येक फॉरमॅटचा गोलंदाज आहे. जेव्हा फॉक्स क्रिकेटने ट्रॅव्हिस हेडला विचारले की बुमराहला सामोरे जाणे कसे वाटते ? हे आव्हान सोपे जाणार नसल्याचे ट्रॅव्हिस हेडने म्हटले आहे.
बुमराहच्या क्षमतेचे वर्णन करताना शेन वॉटसन म्हणाला की, 2016 मध्ये जेव्हा त्याने ऑस्ट्रेलियाचा पहिला दौरा केला तेव्हा तो फक्त इनस्विंग गोलंदाज होता. पण, आता तो चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करतो. याशिवाय गोलंदाजीतील फरक आणि वेगावरील नियंत्रण यामुळे तो आणखी मोठा धोका निर्माण करतो, यातून ऑस्ट्रेलियाच्या मनात जसप्रीत बुमराहची भीती सतावत असल्याचे स्पष्ट होत आहे.