---Advertisement---
---Advertisement---
Pat Cummins । पॅट कमिन्सने त्याच्या नेतृत्वाखाली जवळपास प्रत्येक स्पर्धा जिंकल्या आहेत. परंतु, भारतीय संघाने गेल्या 4 वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे. यात दोनवेळा भारताने ऑस्ट्रेलियाला त्याच्या घरच्या मैदानावर पराभव केला आहे. तर ऑस्ट्रेलियन संघ गेल्या 10 वर्षांपासून म्हणजेच 2014 पासून या मालिकेत टीम इंडियाला पराभूत करू शकलेला नाही. अशातच मालिका अजून सुरूही झालेली नसताना पॅट कमिन्सने नुकत्याच केलेल्या वक्तव्यात भारताची स्थिती एकदिवसीय विश्वचषकासारखी करणार असल्याचे सांगितले आहे.
पॅट कमिन्स काय म्हणाला ?
भारतीय संघ लवकरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी रवाना होणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा विचार करता ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे.
पॅट कमिन्सने नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान या मालिकेबद्दल सांगितले. 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सामन्यापूर्वी त्याने भारताची स्थिती वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासारखी होणार असल्याचे सांगितले आहे.
कमिन्स म्हणाला की, ‘जेव्हा संघ दबावाखाली असतो तेव्हा त्यांच्याविरुद्ध खेळणे ही वाईट गोष्ट नाही. यापूर्वीही त्यांनी येथे येऊन चांगली कामगिरी केली आहे. पण आमचे काम त्यांना शांत ठेवणे आहे.’ पॅट कमिन्सने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान असेच म्हटले होते. अंतिम सामन्याच्या आधी, त्याने भारतीय चाहत्यांवर निशाणा साधला आणि म्हटले की ‘मोठा जमाव शांत होताना पाहण्यापेक्षा समाधानकारक काहीही असू शकत नाही.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी हे एकमेव लक्ष्य
पॅट कमिन्सने यापूर्वीच ऑस्ट्रेलियासाठी ऍशेस मालिका, जागतिक कसोटी चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. पण बॉर्डर-गावसकर ट्रॉफी त्यांना अद्याप जिंकता आलेली नाही. त्यामुळे मालिका सुरू होण्यापूर्वी कमिन्सने बॉर्डर-गावस्कर करंडक ही एवढी मोठी मालिका असल्याचे म्हटले.
कमिन्सच्या मते, घरच्या मैदानावर सलग दोन मालिका गमावल्यानंतर प्रत्येकजण त्याबाबत गंभीर आहे आणि येणारा हंगाम खूप मोठा असणार आहे. संपूर्ण संघ जोरदार तयारी करत आहे आणि चांगली कामगिरी करण्याची पूर्ण आशा आहे.
