पहूर : जामनेर मार्गावरील सोनाळा शीव रस्त्यावर अज्ञात तरुणाचा खून झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली होती. जळगाव गुन्हे शाखेने तपासचक्रे फिरवत या खुनाची 24 तासात उकल केली असून या प्रकरणी शिंगाईतच्या आरोपीला अटक केली आहे. रवींद्र उर्फ बाळू भगवान हडप (41, शिंगाईत, ता.जामनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव असून प्रमोद उर्फ बाळू वाघ (37) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पैशांवरून वाद झाल्याने डोक्यात टाकला दगड
पहूर-जामनेर मार्गावील हॉटेल वृंदावन नजीक सोनाळा-पहूर शीव रस्त्यावर सोनाळा येथील प्रफुल्ल भरत पाटील यांच्या कपाशीच्या शेतात मंगळवारी दुपारी चार वाजता बाळू वाघ व संशयित रवींद्र उर्फ बाळू भगवान हडप हे मद्यप्राशन करण्यासाठी बसल्यानंतर दोघांमध्ये उसनवारीच्या पैशातून वाद सुरू झाला. यावेळी मद्याच्या नशेत बाळू वाघ याने काठीने रवींद्रला मारहाण केल्याने त्याचा राग आल्याने रवींद्रने बाळूच्या डोक्यात भला मोठा दगड दोन वेळा मारला व रक्तस्त्राव सुरू झाल्याने व तो हालचाल करीत नसल्याने त्याची दुचाकी व मोबाईल घेवून रवींद्र पसार झाला. जळगाव गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणानंतर 24 तासात आरोपी निष्पन्न करीत त्याला अटक करीत गुन्ह्यातील दुचाकीसह मोबाईल जप्त केला.
यांनी उघडकीस आणला खुनाचा गुन्हा
पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा.पोलीस अधीक्षक ऋषीकेश रेड्डी, जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश वाघमारे, एएसआय युनूस शेख, हवालदार महेश महाजन, लक्ष्मण पाटील, संदीप सावळे, किशोर राठोड, रणजीत जाधव, सचिन महाजन, ईश्वर पाटील, लोकेश माळी, चालक रमेश जाधव आदींनी हा गुन्हा उघडकीस आणला. संशयीत आरोपीला पहूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे करीत आहेत.