पोरकटपणा आणि आत्मभान

द़ृष्टिक्षेप

– उदय निरगुडकर

काँग्रेस चुकांपासून शिकत नाही हेच खरे राहुल गांधींच्या बेताल वक्तव्यांमुळे भाजपा-राष्ट्रीय स्वयंसेवक संघासकट सर्व हिंदुत्ववादी संघटनांना त्यांचे विचार समाजात ठसवण्याची संधी वारंवार उपलब्ध होत असते. कधी कधी या संघटनांचा स्वर हा कर्कश्श आणि एकांकिक वाटतो. कारण त्यांना प्रतिक्रिया तिखटपणे द्यायची असते. त्यामुळे हिंदुत्वाच्या सर्वसमावेशक मांडणीला काहीसा तडा जातो अन् सेक्युलरवाद या नावाखाली भोंगळ मांडणीला अभ्यासपूर्ण प्रतिवाद करायचा राहून जातो. मोदी या आडनावावर सरसकटपणे चोर असे संबोधून राहुल गांधी यांनी सूरत कोर्टाची नाराजी ओढवून घेतलीच. त्यांना दोन वर्षे कैदेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यावेळी ‘मी सावरकर नाही, मी गांधी आहे आणि गांधी माफी मागत नसतात’, असे उद्गार काढून त्यांनी जुन्या वादाला नव्याने तोंड फोडले. राहुल गांधी यांनी यापूर्वीदेखील अशी अज्ञान, अल्पज्ञानावर आधारित बेताल वक्तव्ये केली आहेत. अनेकदा त्यांचे वागणे आणि विधाने पोरकट आणि हास्यास्पद ठरली आहेत. आपल्याच सरकारचा अध्यादेश फाडणे, संसदेत डोळे मारणे, पंतप्रधानांना मिठी मारणे अशी एक ना अनेक उदाहरणे या अनुषंगाने देता येतील. त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर विशेष राग आहे. आकस आणि पूर्वग्रह आहे. त्यामुळे एक अजेंडा ठरवून ते वारंवार सावरकरांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने वैचारिक हल्ले चढवत असतात.

खरे तरराहुल गांधी यांच्या आजी आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकरांवरील पहिले टपाल तिकीट प्रकाशित केले होते. इतकेच काय तर, दादरच्या सावरकरांच्या राष्ट्रीय स्मारकाला वैयक्तिक उत्पन्नातून भरघोस देणगीही दिली होती. पण आज राहुल गांधी आणि पर्यायाने आजची काँग्रेस सावरकरांची प्रतिमा मलिन करायला वारंवार धजावत आहेत आणि तिथे त्यांची फसगत होत आहे. ‘हिंदू’ या शब्दाची इतकी अ‍ॅलर्जी राहुल-सोनिया काँग्रेसला का बरे वाटावी? त्यामुळे हिंदू या झेंड्याखाली जे जे हाती लागेल त्यावर हे मायलेक आणि पर्यायाने उर्वरित काँग्रेस तुटून पडते. यामुळे त्यांची पीछेहाट होताना दिसते आहे. हे एक कथ्याचे युद्ध आहे आणि यातील कळीचा मुद्दा आहे तो सावरकरांनी मागितलेल्या कथित माफीचा. मुळात ती माफी नाही तर तो दयेचा अर्ज आहे. माफीनामा आणि दयेचा अर्ज यात फरक आहे. दयेचा अर्ज हा त्या काळातील कायद्यानुसार एखाद्या कैद्याला मिळालेला अधिकार आहे. आपण आज अटकपूर्व जामीन घेतो अथवा अटक झाल्यावर जामीन अर्ज करतो तसाच हा प्रकार. ब्रिटिशांच्या काळात राजकीय कैद्यांना दयेचा अर्ज करता येत होता. इंग्लंडमध्ये कायद्याची परीक्षा (बॅरिस्टर) उत्तीर्ण झालेल्या सावरकरांना कायद्यातील या तरतुदीचा पूर्ण अभ्यास होता. अटक झाली तेव्हा त्यांचे वय अवघे 27 वर्षांचे होते. पुढची 50 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा काढणे म्हणजे आयुष्यातील परमकर्तृत्वाचा कालावधी 7 बाय 11 च्या कालकोठडीत निरर्थकपणे व्यतीत करणे.

असे 50 वर्षे सडण्यापेक्षा युक्तीने किंवा धोरण म्हणून काही अटी स्वीकारून तुरुंगातून बाहेर पडावे आणि मातृभूमीची सेवा करून ऋण फेडावे हा धोरणात्मक डावपेचाचा भाग होता. शक्तीपुढे युक्तीने श्रेष्ठ ठरावे, या डावपेचाचे उत्तम उदाहरण म्हणून याकडे पाहावे लागेल. केलेले दयेचे अर्ज लपून छपून नव्हते. त्यांनी इतर कैद्यांनाही असे अर्ज करायला उद्युक्त केले. इतकेच काय तर, ‘माझी जन्मठेप’ या पुस्तकात ते अर्ज छापलेदेखील. ‘युवर मोस्ट ओबिडियन्ट सर्वंट’ अशा प्रकारे पत्राचा शेवट करण्याची तत्कालीन पद्धती होती. यावरून त्यांना ब्रिटिश सरकारचा सेवक-चाकर म्हणणे, हस्तक म्हणणे मूर्खपणाचे आहे. इंग्लंडच्या राजाचा उल्लेख नेहरू घराण्यातील व्यक्तींनी अनेकदा ‘युवर मॅजिस्टी’ असा केला आहे. मग त्याला आपण काय म्हणणार? स्वत राहुल गांधी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरण, राफेल प्रकरण, चौकीदार चोर है प्रकरण यात सपशेल माफी मागितली आहे. ‘गांधी हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार’ या भिवंडीतील उद्गारावरून ते कोर्ट-कचेर्‍यांमध्ये पुरते अडकले आहेत. भूतपूर्व सरन्यायाधीश बोबडे यांच्यासमोर चाललेल्या खटल्यात गांधीहत्येत संघाचा सहभाग नव्हता, असा स्पष्ट निर्वाळा देण्यात आला आहे. भिवंडी खटल्यात तर एक प्रमुख साक्षीदार म्हणून माझेच नाव आहे.
हा प्रश्न आता पूर्णपणे राजकीय बनला आहे. राहुल गांधींच्या उद्गाराला प्रत्युत्तर म्हणून भाजपाने महाराष्ट्रभर ‘सावरकर गौरव यात्रा’ काढल्या. महाविकास आघाडीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैव आहे की, आमचे महापुरुष असे जातीत आणि पक्षात विभागले गेले आहेत. हे कुठे तरी थांबले पाहिजे. यापुढे जाऊन एक वेगळा मुद्दा मांडायचा आहे आणि तो म्हणजे इतिहासाच्या विकृतीकरणाचा. 70 वर्षांच्या कालावधीत काँग्रेसने शालेय अभ्यासक्रमापासून सर्वत्रच इतिहासाचे एकतर्फी, सोयीस्कर असे शिक्षण दिले. शाळांमधून शिकवला जाणारा इतिहास म्हणजे राज्य करणारे मुघल, हरणारे, जातीपातीत विभागले जाणारे हिंदू असेच शिकवले गेले. ही सर्व पाठ्यपुस्तके शिकवण्याच्या पद्धती यांची पुनर्मांडणी आवश्यक आहे. पश्चिम बंगालमधील शालेय पुस्तकांमधून गजनी ते औरंगजेब या मुघल काळात इथे जो हैदोस घातला गेला, देवळे तोडली गेली, सक्तीचे धर्मांतर, जिझिया कर हे सर्व गाळून टाकले आहे, असे ऐकिवात आहे. ‘सेक्युलर’ या नावाखाली देशाकडे कोरड्या नजरेने पाहणारी पिढी मग देश काय घडवणार?

गांधी, नेहरूंव्यतिरिक्त स्वातंत्र्यासाठी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, अशफाकउल्ला खान अशांनी केलेल्या त्यागाचा अभ्यासक्रमात उल्लेखच नाही. एनसीईआरटीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि राणा प्रताप हे नाहीतच. दक्षिणेकडील अनेक अफलातून मंदिरे, स्थापत्यकला यांनाही अभ्यासक्रमात स्थान नाही. लक्षात घ्या, इतिहासाच्या अभ्यासाने कोणालाही इंजिनीअरिंग किंवा डॉक्टरसारखे जॉब मिळणार नाहीत, करीअर घडणार नाही, पण इतिहासाचे अज्ञान वर्तमानात आमची ओळख पुसायला लावतो आणि भविष्यातील गुलामाची बीजे पेरतो. आज पाठ्यपुस्तकातून सावरकर शिकवले नाहीत तर उद्या हीच मुले शहरी नक्षलवादाला सर्रासपणे बळी जातील. वयाची चाळिशी येईपर्यंत 17 व्या शतकात भारत जगामध्ये एक आर्थिक महासत्ता होता. जागतिक व्यापारातील आमचा वाटा 25 टक्के होता. चोल वंशीयांची राजवट, शिवाजी महाराजांचे आरमार यांचा तर दूरदूरचा संबंध आमच्या पिढीशी आला नाही. मग बाप्पा रावळ, आसाममधील अहोम लढवय्ये यांची तर बातच सोडा. आत्ता-आतापर्यंत आम्हाला आझाद हिंद सेना हे चुकलेले देशभक्त वाटायचे. म्हणूनच शंका येते की, कुणीतरी पद्धतशीरपणे या इतिहासाचे असे निर्बीजीकरण केले का की ज्यातून राष्ट्रीय अभिमानाचे कोणतेही बीज रोवले जाणार नाही. ही लढाई इतकी सोपी नाही. केवळ पाठ्यपुस्तक बदलून नव्हे तर अनेक पातळ्यांवर लढावी लागेल. सर्वच पातळ्यांवर झालेले इतिहासाचे काँग्रेसीकरण बदलून त्याचे सत्यकरण करण्याची गरज आहे.

आणखी एक, भारतातील मुसलमान हे बाबर, गजनी, दुर्राणी, अब्दाली यांच्यासारख्या परक्यांचे वंशज नाहीत. ते मूळ हिंदूच आहेत. त्यांचे धर्मांतर झाले आहे. त्यांच्या उपासना पद्धती वेगळ्या आहेत. त्यांनी सावरकरांना दैवत मानण्यात कोणताही धोका किंवा कमीपणा नाही. किंबहुना, राष्ट्रीय प्रवाहात येण्याचा तो एक हमखास मार्ग आहे. आमच्याकडे इतिहासातील कथ्यांचे हे ओझे आता डोईजड होऊ लागले आहे. त्यामुळे वर्तमान आणि भविष्य यावर लक्ष केंद्रित करणे कठीण होत आहे. गरज आहे ती ठामपणे सांगणार्‍यांची.

– 9820066446

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)