Brasilia: नवं वर्ष सुरू झालं आहे. जगभरात २०२४ चं स्वागत करण्यात आलं आहे. नवं वर्ष कसं असणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. ‘जिवंत नास्त्रोदमस‘ नावानं ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध एथोस सॅलोम यांनी २०२४ मध्ये घडणाऱ्या घटनांबद्दल भविष्यवाणी केली आहे. ब्राझीलमध्ये राहणाऱ्या एथोस यांनी केलेली भाकितं चिंता वाढवणारी आहेत.
नव्या वर्षात आफ्रिकेपासून दक्षिण चीन समुद्रापर्यंत विध्वंस, विनाश होईल, अशी भीतीदायक भविष्यवाणी एथोस यांनी केली आहे.दक्षिण चीन समु्द्रातील घटनांमुळे जागतिक संकट निर्माण होण्याचा धोका एथोस सॅलोमनं बोलून दाखवला. २०२४ च्या पहिल्या तिमाहीत अमेरिका, चीन आणि रशिया यांच्यात खटका उडू शकतो. तैवानवरुन जागतिक संकट निर्माण होऊ शकतं, असा धोका त्यांनी वर्तवला.
रशिया युक्रेन युद्धात अमेरिका किंवा नाटो देशांनी सहभाग घेतल्यास परिस्थिती बिघडू शकते. मध्य पूर्वेत अनेक देशांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यांच्या हस्तक्षेपांमुळे मध्य पूर्वेतील स्थिती अस्थिर आहे. आफ्रिकेतील लिबिया, सुडान आणि नायजेरिया यांच्यासारख्या देशांमधील वाद नैसर्गिक संसाधनांपर्यंत पोहोचण्याचा धोका त्यांनी बोलून दाखवला. भारत-पाकिस्तान आणि कोरियन द्विपकल्प भागातील चिंतादेखील वाढू शकते, अशी भविष्यवाणी सॅलोम यांनी केली.
२०२४ मध्ये भारताची चांगली आर्थिक प्रगती होईल. विकासाच्या बाबतीत भारत वाघ असेल, असं सॅलोम म्हणाले. आफ्रिकन देशांमध्ये फिनटेक क्षेत्रासह तांत्रिक विषयात जागरुकता येईल. व्हिएतनाम, फिलिपीन्स आणि चीनमधील काही भागांमध्ये वादळं येतील, अशी भविष्यवाणी त्यांनी केली आहे.