Breaking : Ajit Pawar आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाची मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पदाधिकाऱ्यांचं तसेच कार्यकर्त्यांचं मनोबल वाढावं, यासाठी अजितदादा गटाकडून त्यांना महागड्या गाड्या देखील भेट देण्यात येणार आहे. मात्र, दुसरीकडे अजित पवार यांच्या बंडामुळे काही कार्यकर्ते नाराजही झाले आहेत
पिंपरी चिंचवडमधील अजितदादा गटाच्या (Ajit Pawar) बड्या पदाधिकाऱ्याने ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एक मोठे पदाधिकारी समजले जाणारे संजोग वाघेरे हे आज आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
यासाठी वाघेरे भल्यापहाटे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड शहर हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादीचे इथे मोठी ताकद आहे.
त्याच राष्ट्रवादी गटाचे माजी शहराध्यक्ष तथा माजी महापौर संजोग वाघेरे हे आज अखेर शिवबंधन बांधणार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातून संजोग वाघेरे यांची शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी निश्चित असल्याचे बोलल जात आहे.
संजोग वाघेरे हे राष्ट्रवादी अजित पवार गट सोडून शिवबंधन बांधणार असले तरी यावेळी पक्ष सोडत असताना वाईट वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना वाघेरे हे भावूक देखील झाल्याचं पाहायला मिळालं आहे.