Breaking : टीवायबीएच्या अर्थशास्त्राच्या पाचव्या सेमिस्टरला दिली सहाव्या सेमीस्टरची प्रश्नपत्रिका

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिक्षा विभागाच्या भोंगळ कारभाराचा अनुभव आज पुन्हा विद्यार्थ्यांना आला. टिवाय बीएच्या अर्थशास्त्राच्या पाचव्या सत्राच्या पेपरला सहाव्या सत्राच्या अभ्यासक्रमाचे प्रश्न आल्याने विद्यार्थी गोंधळात पडले. त्यांनी विद्यापीठाकडे तक्रार केल्यानंतर त्यांना प्रश्न पत्रिका बदलून देण्यात आली आहे.

टीवायबीए अर्थशास्त्राच्या पाचव्या सेमिस्टरचा आज शनिवारी दुपारी 12.30 ते 2.30 या वेळेत पेपर होता. विद्यापीठाच्या निर्धारीत वेळेत पेपर सुरू झाला. प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी वाचली असता सर्व प्रश्न हे सहाव्या सत्रातील असल्याचे लक्ष्ाात आले. त्यांनी याबाबत परिक्षा केंद्रासह विद्यापीठाकडे तक़्रार केली.

अन्‌‍ प्रश्नपत्रिका बदलवून दिली
विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार विद्यापीठाच्या परिक्षा विभागाने प्रश्नपत्रिकेबाबत खातरजमा केली. विद्यार्थ्यांनी केलेली तक्रार सत्य असल्याचे आढळले. त्यामुळे परिक्षा विभागाने लगेच दुसरी प्रश्नपत्रिका पाठवली.

परिक्षा विभागाच्या भोंगळ कारभार संपणार कधी ?

मागील आठवड्यात एसवाय बीएस्सीच्या मायक्रोबॉयोलॉजी च्या पेपरला दिलेली प्रश्नपत्रिका चुकीची होती. याबाबत तक्रार येताच विद्यापीठाने तात्काळ ऑनलाईन दुसरी प्रश्नपत्रिका पाठविली होती. मात्र तीही चुकीची निघाली. त्यामुळे पुन्हा तीसरी प्रश्नपत्रिका पाठवली. हा गोंधळ संपत नाही तोच टीवाय बीएच्या अर्थशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा हा नवा गोंधळ समोर आला.

विद्यार्थ्यांच्या मानसिक त्रासाचे काय
विद्यापीठाच्या परिक्षा विभागाच्या भोंगळ कारभाराचा विद्यार्थ्याना मोठा फटका बसत आहे. शनिवारी दुपारी 12.30 ला सुरू झालेला पेपर चुकीच्या प्रश्नपत्रिकेमुळे जवळपास 1 ते दीड तासाने सुरू झाला.या मुळे विद्यार्थ्यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला.

वेळ वाढवून दिला
याबाबत विद्यापीठाचे परिक्षा नियंत्रक प्रा.डॉ. योगेश पाटील यांच्याशी पेपर सुरू असताना संपर्क साधला असता विद्यार्थ्यांची तक्रार खरी आहे. त्यांना तात्काळ दुसरी प्रश्नपत्रिका बदलवून दिली आहे. विद्यार्थ्यांना ज्या वेळेस प्रश्नपत्रिका मिळेल त्या वेळेपासून पुढील तीन तासांचा वेळ पेपर लिहीण्यास दिला असल्याचे त्यांनी ‌‘तरूण भारत’शी बोलतांना सांगीतले.