---Advertisement---
धुळे : शेतजमीन अनुदान रक्कमेच्या मोबादल्यात तक्रादाराकडून ७ हजाराची लाच स्वीकारतांना तालुका सहायक कृषी अधिकारी मन्सीराम चौरे व कंत्राटी डाटा ऐंट्री ऑपरेटर रिजवान शेख यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कृषी कार्यालयात रंगेहाथ पकडले. याप्रकरणी साक्री पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साक्री तालुक्यातील किन्नीपाडा येथील एका शेतकऱ्याला त्याच्या शेतजमिनीसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे अनुदान मिळवायचे होते. या अनुदानाची रक्कम जमा करण्यासाठी साक्री येथील सहायक कृषी अधिकारी मन्सीराम कोळशीराम चौरे (वय ४५, रा. जेबापूर, पिंपळनेर) आणि कंत्राटी डेटा एंट्री ऑपरेटर रिजवान रफीक शेख (वय २३, रा. पोळ चौक, साक्री) यांनी शेतकऱ्याकडे १० हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्यास नकार देत शेतकऱ्याने या प्रकरणाची तक्रार धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार तक्रारीची पडताळणी करीत सापळा रचत ही दोघांवर लाच स्विकारताना रंगेहात पकडले.
साक्री येथील कृषी कार्यालयात सापळा रचला
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने साक्री येथील कृषी कार्यालयात सापळा रचला. त्यानुसार सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सहायक कृषी अधिकारी मन्सीराम चौरे यांच्या सांगण्यावरून डेटा एंट्री ऑपरेटर रिजवान शेख याने तक्रारदार शेतकऱ्याकडून ७ हजार रुपयांची लाच स्वीकारता आढळून आले.
या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीचे उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान याकारवाईमुळे कृषी विभागात एकच खळबळ उडाली होती. याकारवाईची साक्री शहरात दिवसभर चर्चा रंगली होती.