उत्तर प्रदेश । महराजगंज येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. नवविवाहित दाम्पत्याचा संसार सुरु होण्याआधीच नवरीने नवऱ्याच्या घरातून काढता पाय घेतला. नववधूने नवऱ्याच्या घरातील कॅश आणि दागिने चोरून पलायन केल्याने सासरच्या मंडळींमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
रामपूर बल्डीहा येथे राहणाऱ्या मनीष याचे लग्न 7 फेब्रुवारी रोजी कोठीभार येथील एका तरुणीशी झाले. मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. 10 फेब्रुवारीला नवरी सासरी आली, आणि तिचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. मात्र कोणालाही कल्पना नव्हती की, नववधूच्या मनात काहीतरी वेगळेच शिजत आहे.
हेही वाचा : Pachora News : कर्मचाऱ्यांकडून मानसिक अन् शारिरीक छळ, महिलेनं उचललं टोकाचं पाऊल
मधुचंद्राच्या रात्री नवरा आपल्या नववधूची वाट पाहत होता, तेव्हाच तिने एक कारण काढून नणदेच्या खोलीत जाण्याचा बहाणा केला. काही वेळाने ती परत आली, पण तिच्या मनात काहीतरी वेगळेच सुरू होते. दुसऱ्या दिवशी सकाळी नवरा जागा झाला, तेव्हा नववधू नव्हती. घरच्यांनी संपूर्ण घरात तिचा शोध घेतला, पण ती कुठेच सापडली नाही.
दागिने-कॅश घेऊन नववधू फरार
थोड्याच वेळात समोर आले की नववधू घरातील कॅश आणि दागिने घेऊन पसार झाली आहे. इतकंच नाही, तर नणदेचेही दागिने ती सोबत घेऊन गेली. या घटनेने संपूर्ण कुटुंब हादरले. लगेच नवरीच्या माहेरी फोन लावण्यात आले, मात्र तिच्या घरच्यांनाही या घटनेबद्दल काही माहिती नव्हती, असे त्यांनी सांगितले.
पीडित नवरदेवाने या संपूर्ण प्रकाराबद्दल पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. त्याने नवरीच्या कुटुंबीयांवरही संशय व्यक्त केला असून, ते या कटात सामील असल्याचा आरोप केला आहे. सध्या घुघली पोलीस ठाण्याचे अधिकारी नववधूचा शोध घेत आहेत.
ही घटना विवाहाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचे एक उदाहरण असून, पोलिसांच्या चौकशीनंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.