नवरदेवाची वरात थेट पोलीस ठाण्यात; काय आहे प्रकरण ?

तरुण भारत लाईव्ह । २३ ऑगस्ट २०२३। अहमदनगर मध्ये एका मंगल कार्यालयात विवाह सोहळा सुरु होता. सनई चौघडे वाजत होते, वऱ्हाडी जमले होते. लग्नाच्या विधी पार पडत होत्या. लग्नघटिका जवळ आली होती. वधू-वर एकमेकांच्या गळ्यात हार घालण्याच्या तयारीत असतानाच अचानक नवरदेवाची पहिली पत्नी लग्न मंडपात हजर झाली. यानंतर नवरदेवाची वरात थेट पोलीस ठाण्यात निघाली. विशाल पवार असे आरोपी नवरदेवाचे नाव आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, विशाल पवार याचे आधीच लग्न झाले आहे आणि त्याला एक मुलगी देखील आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच विशाल दुसरा विवाह करत होता. दुसऱ्या मुलीबरोबर विवाह करून नंतर एका हॉटेलमध्ये लग्न सोहळ्याचे आयोजन केले होते. पतीच्या दुसऱ्या विवाहाची माहिती छत्रपती संभाजी नगरमध्ये राहणाऱ्या पत्नीला कळली. त्यानंतर पत्नीने तात्काळ आई-वडील आणि इतर नातेवाईकांसह नगर गाठले.

नगरमधील मंगल कार्यालयाचा पत्ता शोधला आणि लग्न लागायच्या आत पत्नी लग्नमंडपात हजर झाली. लग्नमंडपात पहिल्या पत्नीने चांगलाच राडा केला. वऱ्हाड्यांपैकी कुणीतरी पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस तात्काळ मंगलकार्यात हजर झाले आणि लग्नाची वरात थेट पोलीस ठाण्यात नेली.

पहिल्या पत्नीच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस ठाण्यात विशाल पवार याच्याविरोधात कलम 494 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विशाल हा जालना जिल्ह्यातील रहिवासी आहे.  पहिल्या पत्नीपासून दुसरे लग्न लपवण्यासाठी दोन्ही कुटुंबांनी नगरमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. अखेर त्यांचा डाव फसलाच.