धानोरा येथील गुजरातला जोडणारा रंका नदीवरील पूल कोसळला

dhanora-news

नंदुरबार : तालुक्यातील धानोरा ते इसाईनगर दरम्यान रंका नदीवरील पूल उभारण्यात आला होता. हा रस्ता महामार्ग असून गुजरात व महाराष्ट्र राज्याला जोडतो. 29 रोजी सकाळी 8.45 वाजेदरम्यान अचानक हा पूल कोसळला. त्यामुळे पूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यासह प्रशासनाचे पथक घटनास्थळी रवाना झाले. नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथे ब्रिटीश काळात पुल तयार करण्यात आला होता. या पुलाची मुदत पूर्ण झाल्याने पुल सर्व बाजूंनी खचला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्ता पाळधी-अमळनेर-शिंदखेडा-दोडांईचा-नंदुरबार- धानोरा ते गुजरात राज्य हद्द हा राज्यमार्ग क्रमांक सहावरील 165/650 मधील धानोरा गावाजवळील मोठा पुल सकाळी 9.30 वाजता कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ही पुर्णत: बंद करण्यात आली आहे. यामार्गावरील वाहतूक नवापूरकडे जाणारी अवजड वाहतुक करणखेडा गावाजवळून धुळवद गावाकडे वरुन वळविण्यात आली आहे. तर गुजरातकडे जाणारी वाहतुक धानोराकडून नटावद-आर्डीतारा मार्गे तर इतर लहान वाहनांसाठी वाहतपक धानोरा गावातून पर्यायी पुलावरुन वळविण्यात आली आहे. रंका नदीवर करण्यात आलेल्या पुलाचे बांधकाम स्तंभ हे दगडी बांधकामाचे होते. त्यावर आरसीसी स्लॅबचे बांधकाम करण्यात आले होते. दगडी बांधकामातील स्तंभ कोसळल्याने पुल क्षतिग्रस्त झाल्याचे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, नंदुरबार यांनी पत्रकान्वये कळविले आहे.