ब्रिटनचे पंतप्रधान म्हणाले, मी हिंदू म्हणून आलोय… जय सियाराम

कॅम्ब्रीज : भारताच्या स्वतंत्रता दिनानिमित्त कॅम्ब्रीज विद्यापीठात आयोजित मोरारी बापूंच्या रामकथा कार्यक्रमात ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाला उपस्थित राहणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मी येथे एक हिंदू म्हणून रामायण कार्यक्रमात रामायण ऐकण्यासाठी आलो आहे. देशाचा पंतप्रधान म्हणून नाही, असे सुनक यांनी म्हटले. त्यानंतर, ”जय सियाराम”चा जयघोष करत आपल्या भाषणाला सुरुवात केली.

पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले की, प्रभू श्रीराम हे माझ्यासाठी प्रत्येक अडचणींवर धैर्याने मात करण्याचं, विनम्रपणे शासन करणे आणि निस्वार्थ भावनेने काम करण्याची प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व आहे. हिंदू धर्मग्रंथांनी ज्याप्रकारे नेतृत्त्व करण्याचं शिकवलं आहे, त्याप्रमाणे नेतृत्व करण्याची इच्छा मी बाळगतो, असेही सुनक यांनी म्हटले आहे.

माझ्यासाठी आस्था हा अत्यंत व्यक्तिगत विषय आहे. त्यातूनच, मला आयुष्यातील प्रत्येक वळणावर योग्य मार्गदर्शन मिळत आहे. पंतप्रधान बनने हा मोठा सन्मान आहे. मात्र, सहज-सोपं काम नाही. कारण, अनेकदा आपल्याला कठीण निर्णय घ्यावे लागतात. कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. म्हणून, याच आस्थेतून देशासाठी सर्वोत्तम करण्याची प्रेरणा आणि धाडस मला मिळते, असेही सुनक यांनी म्हटलं.