दोन दिवसांवर बैलपोळा; पण शेतकरी चिंतेत, काय आहे कारण?

दोन दिवसांवर बैलपोळ्याचा सण आला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे. बाजारपेठा रंगीबेरंगी साहित्यांनी सजल्या आहेत. मात्र, यावर्षीच्या बैलपोळा सणावर दुष्काळाचं सावट आहे.

कारण राज्यातील बहुतांश भागात अद्याप म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. तर दुसरीकडं पोळा सणावर लम्पी स्कीन आजाराचं सावट देखील आहे. दरम्यान, दिवसेंदिवस पशुधनाची संख्या घटत आहे. पशुधन घटण्याची नेमकी कारणं काय आहेत, तसेच राज्यातील पशुधनाची नेमकी स्थिती काय? याबाबतची सविस्तर माहिती ज्येष्ठ पशुवैद्यक नितीन मार्कंडेय सर यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांच्या दृष्टीनं बैलपोळ्याच्या सणाला विशेष महत्व आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो. मात्र, यावर्षी या सणावर लम्पी स्कीन आजाराचं सावट आहे. तर दुसकरीकडं पावसाचं प्रमाण देखील कमी आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत असल्याचे नितीन मार्कंडेय म्हणाले.

राज्याचा विचार केला तर सध्या पशुधनाची संख्या ही एक कोटी 39 लाख आहे. यामधील एक कोटी 10 लाख जनावरे ही वंशावळीची माहिती नसणारी असल्याचे मार्कंडेय म्हणाले. यातील 15 लाख जनावरे ही शुद्ध जातीची आहेत. तर उरलेली जनावरे 27 लाख जनावरे संकरीत आहेत. राज्यात म्हशींची संख्या ही 55 लाखांच्या आसपास असल्याची माहिती मार्कंडेय यांनी दिली.